आश्विन कृष्ण चतुर्दशीला येते, ती ‘नरक चतुर्दशी’ ! या दिवशी पहाटे सुवासिक तेल, उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने देव आणि प्रजा यांना त्रास देणार्या नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला; म्हणून हा आनंदोत्सव सर्वत्र दिवे लावून साजरा केला गेला. मृत्यूसमयी नरकासुराने श्रीकृष्णाकडे आपली इच्छा प्रकट केली, ‘आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होणार नाही, तसेच माझा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा.’ श्रीकृष्णाने ‘तथास्तु’ म्हणून त्याची इच्छा पूर्ण केली. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या जीवनात नरक निर्माण करणार्या आळस, अस्वच्छता, राग, द्वेष, मत्सर, वैर, प्रमाद या अनिष्ट वृत्तींचा नाश करावा, त्याग करावा, हा त्यामागील खरा अर्थ आहे.
– सौ. प्रज्ञा कुलकर्णी, डोंबिवली (साभार : ‘आदिमाता दीपावली विशेषांक’)