विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात मिरज आणि जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट !

(‘हेट स्पीच’ म्हणजे द्वेषपूर्ण वक्तव्य करणे)

मिरज येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार वैभव पाटील (डावीकडे) यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज – उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) मिरज (जिल्हा सांगली) आणि जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) या दोन्ही गावांतील शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ केल्याच्या संदर्भात आणि धार्मिक भावना दुखावल्याविषयी संबंधित सर्वांवर तात्काळ गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारींद्वारे करण्यात आली आहे.

जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

जयसिंगपूर

१८ ऑक्टोबर या दिवशी जयसिंगपूर येथील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी ही तक्रार स्वीकारली. या वेळी भाजपचे ग्रामीण विभाग चिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, सनातनचे श्री. अण्णासाहेब वरेकर, भाजपचे शहराध्यक्ष श्री. मिलिंद भिडे, सौ. वैशाली निंबाळकर, सौ. शशिकला पाटील, भाजपचे श्री. संतोष बिराजदार, झेबा आय पठाण, भाजपचे श्री. सुनील ताडे, श्री. स्वप्नील कदम, कु. ऋचा काळे, अधिवक्ता प्रसाद काळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे आदी उपस्थित होते.

विशेष

जयसिंगपूर येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्वरितच तेथील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी ‘हेट स्पीच’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्याची सिद्धता दर्शवली. त्यानंतर तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

मिरज

१९ ऑक्टोबर या दिवशी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. ही तक्रार ठाणे अंमलदार वैभव पाटील यांनी स्वीकारली. या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. विनायक कुलकर्णी आणि श्री. संतोष लांबदाडे, अधिवक्ता सी.जी. कुलकर्णी,  हिंदुत्वनिष्ठ श्री. पराग नाईक आणि श्री. शशिकांत भोसले, शिवसेना व्यापारी सेनेचे श्री. पंडित(तात्या) कराडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गिरीश पुजारी यांसह अन्य उपस्थित होते.

गोपीचंद पडळकर यांनी ७ दिवसांत क्षमा न मागितल्यास फौजदारी खटला नोंद करण्याची चेतावणी !

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा अन् खासदार सुप्रिया सुळे यांचा अवमान करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निनाद यादव यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ७ दिवसांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची क्षमा न मागितल्यास पडळकर यांच्या विरोधात न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी खटला नोंद करण्याची चेतावणी दिली आहे. पडळकर जाणून-बुजून पवार कुटुंबियांविषयी बेताल वक्तव्ये करतात. निवडणूक आयोगाकडे प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणार्‍या पडळकर यांची विचारशून्य शक्ती असल्याचे सिद्ध आहे. ‘त्यांनी स्वतंत्रपणे लेखी क्षमा मागावी’, अशी चेतावणी देऊन अब्रू नुकसानीचा दावा, तसेच निवडणूक आयोगाकडे खोटी माहिती दिल्याप्रकरणी खटला नोंद करण्याची चेतावणी या नोटिसीमध्ये दिली आहे.