देवाची ओढ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज (जि. सांगली) येथील कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय १३ वर्षे) !

आश्विन शुक्ल सप्तमी (२१.१०.२०२३) या दिवशी कु. अर्जुन पुजारी याचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्यामध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सौ. स्नेहा गिरीश पुजारी
कु. अर्जुन गिरीश पुजारी

कु. अर्जुन गिरीश पुजारी याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. आत्मविश्वास वाढणे : ‘मागील काही मासांपासून कु. अर्जुनमधील आत्मविश्वास बराच वाढला आहे. पूर्वीच्या मानाने आता तो सर्व गोष्टी आत्मविश्वासाने आणि कुणाच्याही साहाय्याविना करतो.

२. हट्ट न्यून होणे : पूर्वी तो एखाद्या गोष्टीसाठी पुष्कळ हट्ट करायचा; पण आता समजावून सांगितल्यावर हट्ट करत नाही.

३. इतरांना साहाय्य करणे : त्याचे इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. तो त्याच्या शाळेतील अंध आणि दिव्यांग मुलांना साहाय्य करतो. त्यामुळे शिक्षिका त्याचे नेहमीच कौतुक करतात. त्याच्या शाळेतील शिक्षिका मला म्हणतात, ‘‘तुम्ही सनातन संस्थेचे साधक असल्यामुळे अर्जुनवर चांगले संस्कार झाले आहेत. तो आदर्श विद्यार्थी आहे.’’ तो मला स्वयंपाकघरात, तसेच सेवेच्या संदर्भातही साहाय्य करतो.

४. योगामध्ये प्राविण्य : अर्जुन गेली ५ वर्षे (म्हणजे वयाच्या ८ व्या वर्षापासून नित्य योगासने करतो. आतापर्यंत त्याने अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

५. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे

अ. अर्जुनची ऐकण्याची क्षमता अल्प आहे. ऐकण्यासाठी त्याला श्रवणयंत्र लावावे लागते. पूर्वी त्याच्यातील ही उणीव त्याला स्वीकारता येत नसे; पण त्याला समजावून सांगितल्यावर आता त्याने ते स्वीकारले आहे.

आ. आता त्याला त्याच्याकडून झालेल्या चुका सांगितल्यावर तो त्या लगेच स्वीकारतो.

६. देवाची ओढ वाढणे

६ अ. व्रतबंधानंतर प्रतिदिन स्वतःहून संध्या आणि नामजप करणे : पूर्वी तो त्याच्या वडिलांच्या समवेत बसून नामजप करत असे. व्रतबंध झाल्यापासून आता तो प्रतिदिन संध्या आणि नामजप स्वतःहून करतो.

६ आ. अग्निहोत्र करणे : सध्या तो मिरज येथील आमच्या घरी प्रतिदिन संध्याकाळी अग्निहोत्र करतो. तो देवापाशी धूप आणि उदबत्ती लावून तेल अन् तूप यांचा दिवा लावतो.

६ इ. देवतांची माहिती जिज्ञासेने शोधणे : त्याला अध्यात्माची आवड आहे. त्यामुळे तो देवतांची सुंदर चित्रे सहजतेने काढतो. तो देवतांचे विविध अवतार, त्यांची नावे आणि त्यांचे कार्य यांची माहिती जिज्ञासेने शोधतो.

६ ई. नृसिंहवाडी येथील सेवा आनंदाने करणे : सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीनृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) हे आमचे मूळ गाव ! तो लहान असतांना माझ्या समवेत तेथील दत्तांच्या पालखीला येत असे; पण तो माझ्या समवेतच थांबत असे. आता तो तेथील आमच्या मूळ घरातील देवाची सोवळ्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे, देवाला शास्त्रोक्त नैवेद्य दाखवणे, दत्त महाराजांच्या पादुकांवर पाणी घालणे, पालखीची सेवा करणे इत्यादी सेवा आनंदाने करतो.

७. अर्जुनला छ. शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आदर असून त्यांचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यात रुची आहे.  

स्वभावदोष : चिडचिडेपणा, अनावश्यक माहिती विचारणे, हट्टीपणा, स्वतःच्या मतावर ठाम असणे’

– सौ. स्नेहा गिरीश पुजारी (कु. अर्जुन याची आई), मिरज, सांगली. (२५.६.२०२३)

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. अर्जुन गिरीश पुजारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.१०.२०२३)