लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान सुटीला लागून घेऊ नका !

राज्य निवडणूक आयोगाची विनंती

मुंबई, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – मतदान सुटीच्या दिवसाला लागून घेतल्यास सलग सुटी मिळाल्यामुळे नोकरवर्ग पर्यटनाला किंवा गावाला जातो. त्यामुळे मतदानात घट होते. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान सुटीच्या दिवसाला लागून असलेल्या दिवशी घेण्यात येऊ नये, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

वर्ष २०१९ मध्ये लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या दिवशी झाले होते. यामध्ये २८ एप्रिल या दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आला होता. यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी मतदान झाले. महाराष्ट्रात विधानसभेचे मतदानही २१ ऑक्टोबर २०१९ या दिवशी झाले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २० ऑक्टोबर २०१९ या दिवशी रविवार होता. सलग सुटीमुळे मतदान अल्प होत असल्याचा निष्कर्ष राज्य निवडणूक आयोगाने नोंदवला आहे. त्यामुळे ‘वर्ष २०२४ मध्ये होणारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान सुटीला जोडून घेण्यात येऊ नये’, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.