त्रिसदस्यीय तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल !- मंत्री रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडून चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी केली.

चिपळूण – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १७ ऑक्टोबरच्या पहाटे  शहरातील कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी केली. या वेळी मंत्री चव्हाण म्हणाले की,  पूल कोसळणे, ही दुर्दैवी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गुप्ता, सिन्हा आणि मिश्रा या त्रिसदस्यीय  तज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल.

शहरातील बहादूरशेख नाका येथे १६ ऑक्टोबरला दुपारी २.४५ वाजता  उड्डाणपुलाचा ‘गर्डर’ लाँचरसह कोसळल्याची दुर्घटना घडली होती. त्याची पहाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री चव्हाण म्हणाले की,

१. अनुमाने २ कि.मी. लांबीचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे घडली? याचे अन्वेषण होणे, अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गाची त्रिसदस्यीय तज्ञांची समिती या दुर्घटनेची पडताळणी करून अहवाल देईल.

२. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही हा महामार्ग गतीने झाला पाहिजे, यासाठी बैठक घेऊन सूचना केली होती.

३. मुंबई-गोवा महामार्ग व्हायला हवा, ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय.

४. घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? याविषयी शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.