हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !

दापोली तालुक्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे एकमुखी मागणी

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि आणि कु. ज्योती पवार यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

दापोली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणार्‍या सनातन धर्माचे १०० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. स्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माच्या श्रेष्ठतेची कल्पना जगभरात मांडली. त्या सनातन धर्माची तुलना रोगांशी करून सनातन धर्माला नष्ट करण्याची प्रक्षोभक वक्तव्ये (हेट स्पीच) करणार्‍या दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, तसेच संबंधितांवर गुन्हाही नोंद झालेला नाही.

तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी ही ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून त्याला नष्ट करण्याची भाषा वापरली आहे. धर्म म्हणजे वस्तू वा पदार्थ नसल्याने, त्या सनातन धर्माचे आचरण करणार्‍यांना संपवण्याची ही धमकी आहे. या द्वेषयुक्त वक्तव्यावर अद्याप कारवाई न केल्याने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्याच्या पोलीस महासंचालकांना आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करून सनातन धर्माला नावे ठेवणार्‍यांना अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांच्या नावे देण्यात आले.

येथील पोलीस निरीक्षक उपस्थित नसल्याने पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि आणि कु. ज्योती पवार यांनी निवेदन स्वीकारले.

या वेळी शक्ती केंद्रप्रमुख श्री. सुनील दवंडे (भाजप लाडघर-करजगाव), वारकरी संप्रदायचे ह.भ.प. बाळकृष्ण बाईत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राकेश गुरव, धर्मवीर प्रतिष्ठानचे श्री. चिन्मय गुरव, श्री. नितीन तुपे, श्री. दर्शन मोरे, उसगावचे मनसे  उपशाखाप्रमुख श्री. अजय कोळंबेकर, कुणबी विकास मंचाचे श्री. रमेश भुवड, जाणता राजा प्रतिष्ठान उसगावचे श्री. अरविंद महाडिक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांसह ३२ धर्मप्रेमी उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव – अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आम्हाला भेटायला आलात हे बघून पुष्कळ चांगले वाटले. आम्ही तुमचे हे निवेदन अधिकार्‍यांपर्यंत पोचवतो.