श्रीलंकेतील भारतीय मासेमारांच्या सुटकेसाठी तमिळनाडू मुख्यमंत्र्यांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन व केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

चेन्नई – श्रीलंकेतील भारतीय मासेमारांच्या सुटकेसाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी जयशंकर यांना या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तमिळनाडूतील रामेश्‍वरम् येथील मासेमार संघटनेने श्रीलंकेच्या नौदलाने पकडलेल्या रामेश्‍वरम्मधील मासेमारांची आणि कह्यात घेतलेल्या त्यांच्या नौकांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. ‘तमिळनाडू मासेमार कल्याण संघटने’चे राज्य सरचिटणीस एन.जे. बोस यांनी सांगितले की, १४ ऑक्टोबर या दिवशी श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्‍वरम् येथून २७ मासेमारांसह त्यांच्या ५ नौका कह्यात घेतल्या.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मासेमारांना ओलीस ठेवल्याच्या आणि त्यांच्या नौका जप्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. स्टॅलिन यांनी त्यांच्या पत्रात परराष्ट्रमंत्र्यांना विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करावी.