हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – हमासच्या समोर अल् कायदाही आता पवित्र वाटू लागली आहे, इतके हे लोक (हमासचे आतंकवादी) राक्षस आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हमासवर टीका केली आहे. ‘हमासच्या आक्रमणाविषयी आम्हाला जितकी माहिती मिळत चालली आहे, त्यातून ती भीतीदायक वाटू लागली आहे’, असेही बायडेन म्हणाले. ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

सौजन्य: New York Post

बायडेन म्हणाले की, गाझा पट्टीतील मानवीय संकटावर लक्ष देणेही आमचे प्राधान्य आहे. याविषयी इस्रायल, इजिप्त, जॉर्डन आणि अरब देशांशी चर्चा करत आहेत. आम्हाला ठाऊक आहे की, बहुतांश पॅलेस्टाईन नागरिक हमासचे समर्थन करत नाहीत. इस्रायलमध्ये हमासच्या आक्रमणाला बळी पडलेल्या आणि ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. हमासने ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेसाठी आम्ही दिवस-रात्र प्रयत्न करत आहोत.