पणजी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा सरकारने विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य पुरवण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशक नेमावा, अशी मागणी करणारे पत्र गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी पत्रात लिहिले आहे की, आज जग गतीमान झाले आहे. आज भ्रमणभाषच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे ‘ऑनलाईन’ माध्यमातून धमकी देणे, त्यांच्या बालकांचे शोषण करणे, मुले व्यसनाच्या आहारी जाणे आदी समस्या दिवसागणिक वाढत आहेत. यामुळे मुला-मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न जटील बनत चालला आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होणे, लैंगिक अत्याचाराच्या घटनांविषयी पोलिसांना उशिरा माहिती देणे, अल्पवयीन मुली गर्भवती होणे आदी घटना घडत आहेत. कोरोना महामारीनंतर अनेक मुला-मुलींचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी समुपदेश नेमणे काळाची गरज आहे.’’