हिंदु धर्मप्रेमी गंधर्व ठोंबरे याच्‍या पुढाकाराने कांजूरमार्ग (मुंबई) येथे अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीचे प्राण वाचले !

  • १०८ क्रमाकांवर वारंवार संपर्क करूनही रुग्‍णवाहिका आली नाही !

  • प्रसंगावधान राखून समाजकर्तव्‍य पार पाडणार्‍या कु. गंधर्व ठोंबरे याचे अभिनंदन !

पोलीस, रेल्‍वे कर्मचारी यांची बघ्‍याची भूमिका

कु. गंधर्व ठोंबरे

मुंबई, १० ऑक्‍टोबर (वार्ता.) – ६ ऑक्‍टोबर या दिवशी कांजूरमार्ग येथील रेल्‍वेस्‍थानकावर एक व्‍यक्‍ती रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडलेली होती. त्‍या व्‍यक्‍तीचे डोके फुटले होते आणि ती आजूबाजूच्‍या नागरिकांकडे साहाय्‍य मागत होती; मात्र रेल्‍वेस्‍थानकावरील गर्दीतील कुणीही त्‍या व्‍यक्‍तीच्‍या साहाय्‍यासाठी पुढे येत नव्‍हते. रेल्‍वे पोलीस, रेल्‍वे कर्मचारी आणि साध्‍या वेशातील पोलीस तेथे असूनही यांपैकीही कुणी त्‍या व्‍यक्‍तीला रुग्‍णालयात नेण्‍यासाठी साहाय्‍य करत नव्‍हते. त्‍या वेळी महाविद्यालयात जाण्‍यासाठी रेल्‍वेस्‍थानकावर आलेल्‍या कु. गंधर्व ठोंबरे याने त्‍या व्‍यक्‍तीची स्‍थिती पाहून आजूबाजूच्‍या नागरिकांचे साहाय्‍य घेऊन त्‍या व्‍यक्‍तीला रुग्‍णालयात नेण्‍याची व्‍यवस्‍था केली. त्‍यामुळे त्‍या व्‍यक्‍तीचे प्राण वाचले.

गंधर्व महाविद्यालयात जाण्‍यासाठी कांजूरमार्ग रेल्‍वेस्‍थानकावर पोचला असतांना तिकिट खिडकीच्‍या येथे घायाळ व्‍यक्‍ती रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडली असूनही आजूबाजूला असलेले पोलीस, नागरिक त्‍याला साहाय्‍य करत नव्‍हते. गंधर्व याने रेल्‍वेस्‍थानकावरील कर्मचार्‍यांकडे माहिती घेतली असता ती व्‍यक्‍ती रेल्‍वेमार्गावर घायाळ अवस्‍थेत पडलेली आढळल्‍याचे सांगितले. काही नागरिकांनी त्‍या व्‍यक्‍तीला तिकीट खिडकीच्‍या येथे आणून ठेवले; मात्र अर्ध्‍या घंट्यापासून ती व्‍यक्‍ती तिथेच विव्‍हळत साहाय्‍य मागत होती. तेथे असलेल्‍या पोलिसांना गंधर्व याने त्‍या व्‍यक्‍तीला रुग्‍णालयात नेण्‍याविषयी सांगूनही पोलिसांनी साहाय्‍य केले नाही.

वारंवार संपर्क करूनही शासकीय रुग्‍णवाहिका न येणे !

गंधर्व याने शासकीय रुग्‍णवाहिका बोलावण्‍यासाठी असलेल्‍या १०८ क्रमांकावर संपर्क करून रुग्‍णवाहिका बोलावली. या वेळी रुग्‍णवाहिका येत असल्‍याचे त्‍यांनी कळवले; मात्र ३ वेळा संपर्क करूनही रुग्‍णवाहिका आलीच नाही. रेल्‍वेस्‍थानकाच्‍या बाहेर एक रुग्‍णवाहिका होती; मात्र कुणीही चालक नव्‍हता. या वेळी गंधर्व याने रेल्‍वेस्‍थानकावरील फलाटावर फिरून ‘कुणाला चारचाकी वाहन चालवता येतेका ?’, असे विचारले. या वेळी एका तरुणाने वाहन चालवता येत असल्‍याचे सांगितले. या वेळी त्‍याचे आणि अन्‍य नागरिक यांच्‍या साहाय्‍याने घायाळ व्‍यक्‍तीला राजावाडी विद्याविहार येथील शासकीय रुग्‍णालयात नेले.

अभ्‍यास सांभाळून धर्मप्रसाराच्‍या कार्यात सहभाग ! 

गंधर्व इयत्ता १२ वी मध्‍ये कला शाखेचे शिक्षण घेत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या अंकाचे वितरण, सनातनच्‍या सात्त्विक उत्‍पादनांचे वितरण, तसेच प्रासंगिक सेवेत सहभागी होतो. नियमित नामजप करतो, तसेच धर्मप्रसाराच्‍या कार्यातही अभ्‍यास सांभाळून तो सहभागी होतो.

संपादकीय भूमिका

अशा आपत्‍कालीन परिस्‍थितीत पोलीस, रेल्‍वे कर्मचारी आणि रुग्‍णवाहिकेशी संबंधित कर्मचारी निष्‍क्रीय अन् असंवेदनशील रहात असतील, तर अशांना कर्तव्‍यावर ठेवण्‍यापेक्षा बडतर्फच केलेले योग्‍य ठरेल !