इस्रायल-हमास युद्धाचा होणारा परिणाम

‘हमास या आतंकवादी संघटनेने ७ ऑक्‍टोबर या दिवशी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेटचा मारा केला. तसेच शस्‍त्रास्‍त्रांसह इस्रायलमध्‍ये घुसखोरी करून इस्रायली नागरिकांचे अपहरण केले. त्‍यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्‍यान्‍याहू यांनी हमासच्‍या विरोधात युद्ध पुकारले आहे.

इस्रायलवर रॉकेट आक्रमणानंतर निर्माण झालेले धुराचे ढग

१. इस्रायल-हमास युद्धाचे भयंकर परिणाम !

हमासचे आतंकवादी आणि इस्रायल यांच्‍यात मोठे युद्ध चालू झाले आहे. हमासच्‍या आतंकवाद्यांनी इस्रायलवर ५ सहस्र रॉकेट डागले आहेत आणि या आतंकवाद्यांनी शस्‍त्रास्‍त्रांसह इस्रायलमध्‍ये घुसखोरी केली आहे. ते तेथील नागरिकांची हत्‍या करत आहेत. त्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी इस्रायलचे हमासच्‍या तळांवर आक्रमण चालू आहे. त्‍यासाठी सर्व प्रकारच्‍या शस्‍त्रास्‍त्रांचा वापर चालू आहे. हमासचे तळ हे नागरी वस्‍त्‍यांमध्‍ये आहेत. त्‍यामुळे ते जरी उद़्‍ध्‍वस्‍त केले, तरी त्‍याच्‍यासह त्‍याच्‍या आजूबाजूला रहात असलेल्‍या नागरिकांची मोठ्या संख्‍येने जीवित हानी होणार आहे. या युद्धात इस्रायलची हानी होत आहेच; पण त्‍यासमवेतच पॅलेस्‍टाईनमध्‍ये रहाणार्‍या नागरिकांचेही मोठ्या संख्‍येने जीव जाणार आहेत. त्‍यामुळे हे युद्ध थांबायला पाहिजे. इराण हा हमासला साहाय्‍य करतो, तर इस्रायलकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे आहेत. त्‍यामुळे हे युद्ध जागतिक शांततेला मोठा धोका आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया हे इस्रायलवर दबाव टाकून हे युद्ध थांबवण्‍याचा प्रयत्न करत आहेत. याला किती यश येईल, हे पहावे लागेल.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

२. इस्रायल-हमास युद्धाची व्‍यापकता !

हमासकडे शस्‍त्रास्‍त्रांची कमतरता नाही; पण त्‍यांच्‍याकडे मनुष्‍यबळाची कमतरता आहे. या स्‍थितीत इतर मुसलमान राष्‍ट्रे हमासला मनुष्‍यबळ पुरवून युद्धात भाग घेत आहेत, असे अजून तरी पुढे आलेले नाही. इतर मुसलमान राष्‍ट्रे हमास आणि पॅलेस्‍टाईन यांना नैतिक पाठिंबा देतील, शस्‍त्रे आणि पैसे पुरवतील, युद्धात हानी होईल, तेव्‍हा त्‍यांच्‍या भरपाईसाठी साहाय्‍य करतील; परंतु प्रत्‍यक्ष सैन्‍य बळ पुरवण्‍याइतपत सक्रीय पाठिंबा देणार नाहीत. मध्‍य पूर्वेकडून हमासला पाठिंबा मिळवण्‍यासाठी ते प्रयत्न करतील; पण इस्रायल त्‍यांना चिरडून टाकील.

३. इस्रायल आणि मुसलमान राष्‍ट्रे यांच्‍या संबंधावर परिणाम !

इस्रायलचे सर्वच अरब राष्‍ट्रांशी चांगले संबंध नाहीत. केवळ संयुक्‍त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या दोनच राष्‍ट्रांशी इस्रायलचे चांगले संबंध होत आहेत. त्‍यांचा संबंध व्‍यापार आणि आर्थिक गोष्‍टींशी आहे. इस्रायलला या राष्‍ट्रांशी आर्थिक संबंध निश्‍चितपणे वाढवायचे आहेत. पॅलेस्‍टाईन आणि इस्रायल यांच्‍यातील वैर हे १०० वर्षे जुने आहे. पॅलेस्‍टाईनला स्‍वतंत्र देश व्‍हायचे आहे आणि ते इस्रायल होऊ देणार नाही. इस्रायलला त्‍यांना नष्‍ट करायचे आहे आणि ते नष्‍ट होणार नाही. त्‍यामुळे कारणे काहीही असली, तरी येणार्‍या काळात हे दोघेही एकमेकांशी लढतच रहातील.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.