कार्यालयाकडे ५ सहस्र १३२ प्रकरणे मोजणीच्या प्रतीक्षेत !
सोलापूर – येथील भूमी अभिलेख कार्यालयात ३६ भूकरमापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकाराच्या मोजणीला विलंब लागत आहे. मोजणी झाल्यानंतर त्या भूमीचा अहवाल सिद्ध करण्यासाठीही काही दिवस लागतात, तसेच ते काम भूकरमापकालाच करावे लागते. तोकड्या मनुष्यबळामुळे तातडी आणि अतीतातडीच्या मोजणीचे पैसे भरूनही विलंब होत आहे. (मनुष्यबळाअभावी मोजणी करण्यास अडचणी येऊनही त्याविषयी असंवेदनशील असलेले प्रशासन ! – संपादक)
सोलापूर जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडे सद्य:स्थितीत ५ सहस्र १३२ प्रकरणे मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक एका भूकरमापकाकडे एका मासात १५ प्रकरणे सोपवली जातात; पण मोजणीसाठी येणार्या प्रकरणांचा ओघ मोठा असून दुसरीकडे भूकरमापकांची पदे अल्प आहेत. त्यामुळे एका भूकरमापकाकडे ६० ते ६५ प्रकरणे सोपवली जात आहेत. त्यामुळे मोजणीसाठी अत्याधुनिक ‘रोव्हर मशीन’ आल्यानंतरही विलंब होत असल्याने अर्जदार त्रासले आहेत.