|
नागपूर – ११ लाख रुपये पारितोषिक असलेली जहाल महिला माओवादी रजनी उपाख्य कलावती समय्या वेलादी (वय २८ वर्षे) हिने गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. शासनाने घोषित केलेल्या ‘आत्मसमर्पण योजने’मुळे आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण ५८६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. रजनी वेलादी ऑगस्ट २००९ मध्ये फरसेगड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली होती.
माओवादी शरण येण्यामागील कारणे !
- दलममधील वरिष्ठ गटाचे माओवादी सांगतात की, चळवळ आणि जनता यांच्यासाठी पैसे गोळा करावेत, असे आम्हाला सांगितले जाते. प्रत्यक्षात हा पैसा ज्येष्ठ माओवादी स्वत:साठीच वापरतात. तो पैसा जनतेच्या विकासासाठी कधीच वापरला जात नाही.
- नक्षल दलममधील ज्येष्ठ माओवाद्यांकडून स्त्रियांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते. वरिष्ठ माओवादी नेते स्वत:च्या लाभासाठी गरीब आदिवासी तरुण आणि तरुणी यांचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले, तरीही त्यांना स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
- पोलिसांच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे अरण्यातील वावर धोकादायक झाला आहे. खबरी असल्याच्या संशयावरून आदिवासींना ठार मारायला सांगितले जाते, तर चकमकीच्या वेळी पुरुष माओवादी पळून जातात; मात्र महिला यात ठार होतात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद़्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.