महाराष्‍ट्रात गायींच्‍या संख्‍येत मोठी घट !

राज्‍यशासन भ्रूण प्रत्‍यारोपणाद्वारे गोवंश वाढवणार !

मुंबई – मागील पशूगणनेच्‍या तुलनेत सद्य:स्‍थितीत राज्‍यातील गायींची संख्‍या १० टक्‍क्‍याने न्‍यून झाली आहे. यामध्‍ये डांगी, देवणी, गवळाऊ, खिल्लार आणि लाल कंधारी या देशी गायींच्‍या वंशांचा समावेश आहे. राज्‍यातील देशी गायींच्‍या घटत्‍या संख्‍येचा धोका लक्षात घेऊन राज्‍यशासनाने महाराष्‍ट्रात भृण प्रत्‍यारोपणाद्वारे गायींची संख्‍या वाढवण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सद्य:स्‍थितीत महाराष्‍ट्रातील एकूण पशूसंख्‍या १३ कोटी ९ लाख इतकी आहे. देशी गायी आणि म्‍हशी यांच्‍या संख्‍येत वृद्धी होण्‍यासाठी राज्‍यातील प्रत्‍येक महसूल विभागात एक याप्रमाणे मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अमरावती या ठिकाणी भृण प्रत्‍यारोपण करणार्‍या ६ प्रयोगशाळांची स्‍थापना करण्‍यात येणार आहे. यासाठी ४५० लाख ६८ सहस्र रुपये इतका व्‍यय करण्‍यात येणार आहे. ‘मल्‍टीपल ओव्‍हुलेशन अँड एंब्रियो ट्रान्‍सफर’ आणि ‘ओव्‍हम पिक अप-इनव्‍हिटो फर्टिलायझेशन’ या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशी गायींच्‍या वंशांचे प्रत्‍यारोपण करण्‍यात येणार आहे.

उच्‍च उत्‍पादक क्षमता असलेली गाय तिच्‍या आयुष्‍यात ८ ते १२ वासरांना जन्‍म देऊ शकते; परंतु या तंत्रज्ञानाद्वारे अशा गायींपासून एका वर्षात ८ ते १० आणि गायीच्‍या संपूर्ण आयुष्‍यात ५० ते ६० वासरांची पैदास ‘सरोगेट मदर’द्वारे (कृत्रिमरित्‍या गर्भधारणा करून माता बनवणे) करता येणार आहे. (या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या दुष्‍परिणामांचा अभ्‍यास झाला आहे का ? ज्‍या गायीची क्षमता संपूर्ण आयुष्‍यात १२ वासरांना जन्‍म देण्‍याची आहे, तिने ६० वासरांना जन्‍म दिला, तर तिच्‍या आरोग्‍याची स्‍थिती काय होईल ? याचा विचार केला आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • प्रतिदिन गोरक्षकांना गोमांस किंवा गोवंशियांची अवैध वाहतूक जीव धोक्‍यात घालून पकडावी लागते. गोतस्‍करांचा शासनाने योग्‍य पद्धतीने बंदोबस्‍त केला, तर गोवंशाचे रक्षण आपोआपच होणार आहे. गोवंशियांचे रक्षण करण्‍यात प्रशासन गंभीर का नाही ? हे अनाकलनीय आहे !
  • गोवंश रक्षणाची योग्‍य उपाययोजना काढण्‍याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्‍य आहे ?