महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अंजली कानस्‍कर  हिला नृत्‍याचा सराव करतांना, तसेच अन्‍य वेळी आलेल्‍या विविध अनुभूती

कु. अंजली कानस्कर

१. शिवाच्‍या दोन गीतांवर कथ्‍थक नृत्‍याचा सराव करतांना आलेल्‍या अनुभूती

‘मी नियमित दीड घंटा भारतीय शास्‍त्रीय कथ्‍थक नृत्‍याचा सराव करते. वर्ष २०२१ मध्‍ये मी शिवाच्‍या दोन गीतांवर नृत्‍य बसवले होते. त्‍या नृत्‍यांच्‍या सरावाच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१ अ. ‘नटराज राज नमो नमः ।’ या गाण्‍यावर नृत्‍य करतांना मन निर्विचार होऊन परात्‍पर गुरु डॉ. आठवले शिवाच्‍या रूपात दिसणे आणि ‘नटराज राज नमो नमः ।’ या शब्‍दांच्‍या वेळी भाव जागृत होणे : ‘नटराज राज नमो नमः ।’ या गाण्‍यावर नृत्‍य करतांना मला माझे मन अगदी आनंदी, शांत आणि स्‍थिर वाटत होते. नृत्‍य करतांना माझ्‍या मनात कोणतेही विचार नव्‍हते. जिथे मी नृत्‍य करत होते, तिथे ‘अन्‍य कोणी नसून केवळ मी आणि शिवाच्‍या रूपात परात्‍पर गुरु डॉक्‍टर आहेत’, असे मला जाणवत होते. नृत्‍य करतांना जेव्‍हा गाण्‍यातील ‘नटराज राज नमो नमः ।’ असे बोल येत होते, तेव्‍हा माझा भाव जागृत होत होता. ‘त्‍या वेळी वातावरण पूर्ण शिवमय आणि हलके झाले आहे’, असे मला जाणवत होते.

१ आ. ‘शिव पंचाक्षर स्‍तोत्रा’वर नृत्‍य करतांना आलेल्‍या अनुभूती

१ आ १. ‘शिव पंचाक्षर स्‍तोत्रा’वर नृत्‍य करतांना शिवाच्‍या मारक रूपाची अनुभूती येणे : ‘शिव पंचाक्षर स्‍तोत्र’ हे शिवाच्‍या रौद्र रूपाशी संबंधित असल्‍यामुळे मला ‘शिव पंचाक्षर स्‍तोत्रा’वर नृत्‍य करतांना शिवाच्‍या मारक रूपाची अनुभूती येत होती. ‘वातावरण तेजोमय झाले आहे’, असे मला अनुभवता येत होते. गाण्‍याच्‍या आरंभी ‘शिवाचे अस्‍तित्‍व पंच तत्त्वांमध्‍ये कसे आहे ?’ याचे वर्णन केले आहे. तेव्‍हा ‘प्रत्‍येक तत्त्वामध्‍ये प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आहेत’, असा माझा भाव होता.

१ आ २. हेच नृत्‍य मी एका नृत्‍य स्‍पर्धेत केले होते; पण जो भाव ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या संशोधन केंद्रात नृत्‍य करतांना मला अनुभवायला मिळाला, तसा तेव्‍हा मिळाला नव्‍हता.

१ आ ३. शिव पंचाक्षर स्‍तोत्रावर नृत्‍याचा सराव करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर अपेक्षित भावनिर्मिती होणे : आरंभी नृत्‍य करतांना मला अपेक्षित असा भाव ठेवणे जमत नव्‍हते. असे पुष्‍कळ वेळा झाल्‍यामुळे मला रडू आले. मग मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे देवा, मला का जमत नाही ? तुम्‍हीच मला शक्‍ती द्या आणि माझ्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित असा भाव या नृत्‍यात आणता येऊ द्या.’ गुरुदेवांच्‍या चरणी अशी प्रार्थना करून मी पुन्‍हा नृत्‍य करायला आरंभ केला आणि त्‍यानंतर गुरुदेवांच्‍या कृपेने मला नृत्‍य करतांना अपेक्षित असा भाव आणता आला.’ (५.९.२०२१)

२. ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांच्‍या तबलावादनाच्‍या प्रयोगाच्‍या वेळी साधिकेला देवीच्‍या रौद्र रूपाचे स्‍मरण होऊन तिचे मन स्‍थिर आणि आनंदी होणे अन् ही अनुभूती तिला पुढचे दोन दिवस येणे !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांच्‍या तबलावादनाचे संशोधनपर विविध प्रयोग करून घेतले होते. २०.८.२०२३ या दिवशी ‘नामजप करून तबलावादन केल्‍यावर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्‍यास करण्‍यासाठी श्री. योगेश सोवनी यांच्‍या तबलावादनाचा प्रयोग घेण्‍यात आला. त्‍या प्रयोगाच्‍या वेळी मला वातावरणात देवीतत्त्व जाणवत होते. मला काली मातेच्‍या रौद्र रूपाचे स्‍मरण होत होते. देवीच्‍या रौद्र रूपाचे स्‍मरण होऊनही माझे मन पुष्‍कळ स्‍थिर आणि आनंदी होते. ही अनुभूती मला पुढचे २ दिवस येत होती.

३. देवी आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याशी संबंधित आलेल्‍या काही अनुभूती

३ अ. सेवेपूर्वी केलेल्‍या भावप्रयोगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधिकेसमोर विराट रूपात येणे आणि त्‍यानंतर साधिकेला ‘त्‍यांची पाद्यपूजा करण्‍याची संधी मिळाली’, यासाठी कृतज्ञता वाटणे : २२.९.२०२३ या दिवशी मी संगीताच्‍या अभ्‍यासासाठी साधक जेथे बसतात, तेथे बसले होते. तेव्‍हा मला सहसाधिकेने सांगितलेल्‍या भावप्रयोगाची आठवण झाली आणि ‘तो भावप्रयोग आज करूया’, अशी मनात इच्‍छा निर्माण झाली. त्‍या भावप्रयोगात मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची पाद्यपूजा करत होते. त्‍यात सर्वप्रथम श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ माझ्‍यासमोर विराट रूपात आल्‍या. जेव्‍हा त्‍या माझ्‍या दिशेने येत होत्‍या, त्‍या वेळी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती. त्‍यानंतर मी त्‍यांचे पाद्यपूजन करण्‍यासाठी साहित्‍य घेऊन सर्वप्रथम त्‍यांचे चरणकमल धुतले. त्‍यांचे चरण धुण्‍यापूर्वी पाणी जास्‍त गार तर नाही ना, याची मी निश्‍चिती केली. मी त्‍यांचे चरण धुतले. त्‍यानंतर मी माझ्‍या ओढणीने हळूहळू अलगदपणे त्‍यांचे चरण पुसले आणि त्‍यांच्‍या चरणांची पूजा केली. त्‍यांच्‍या चरणांना अष्‍टगंध लावले. त्‍यांच्‍यावर त्‍यांच्‍या चरणांसमानच एक कोमल फूल वाहिले आणि शेवटी चरणांची आरती केली. हे करतांना ‘त्‍यांनी मला त्‍यांची पाद्यपूजा करण्‍याची संधी दिली’, यासाठी मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटत होती.

३ आ. भावप्रयोगाच्‍या वेळी कुलदेवी श्री भवानीमातेच्‍या रूपात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना अनुभवणे आणि त्‍यांच्‍या विराट रूपातून पुष्‍कळ तेज अन् शक्‍ती प्रक्षेपित होऊन साधिकेला ऊर्जा मिळणे : हा भावप्रयोग अनुभवतांना मला आमची कुलदेवी श्री भवानीमातेचे स्‍मरण झाले. त्‍या वेळी ‘कुलदेवी श्री भवानीमाता आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या वेगळ्‍या नसून एकच आहेत. मी आमच्‍या कुलदेवीस्‍वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची पाद्यपूजा करत आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना कुलदेवीच्‍या रूपात अनुभवतांना वातावरणात आनंदाची अनुभूती येत होती. त्‍यांच्‍या कुलदेवीस्‍वरूपी विराट रूपातून पुष्‍कळ तेज आणि शक्‍ती प्रक्षेपित होऊन मला ऊर्जा मिळत होती.

३ इ. भजन ऐकून देवीला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे कुलदेवीच्‍या विराट रूपात दर्शन होणे : मी माझ्‍या नृत्‍यातील देवीचे एक भजन ऐकते आणि ते भजन ऐकतांना देवीला आळवून तिला अनुभवण्‍यासाठी प्रयत्न करते. आजही मी डोळे मिटून देवीचे ते भजन ऐकून देवीला अनुभवण्‍याचा प्रयत्न करत होते. त्‍या वेळीही मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांचे आमच्‍या कुलदेवीच्‍या विराट रूपात दर्शन होऊन ‘मला पुष्‍कळ ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले.

३ ई. नृत्‍य सरावाच्‍या वेळी थकवा असतांना देवीच्‍या चरणी प्रार्थना केल्‍यावर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री भवानीमाता यांच्‍या कृपाशीर्वादातून मिळालेल्‍या ऊर्जेमुळे भजनावर नृत्‍याचा सराव ३० मिनिटे न थकता करू शकणे : त्‍याच दिवशी संध्‍याकाळी मी नृत्‍य सरावाच्‍या वेळी देवीच्‍या त्‍याच भजनावर नृत्‍यसराव केला. मागील २ – ३ दिवसांपासून मला थकवा होता. ‘मी सराव करू शकणार कि नाही’, हेही मला ठाऊक नव्‍हते. त्‍या वेळी मी देवीच्‍याच चरणी प्रार्थना केली, ‘हे श्री भवानीमाते, आता तूच मला नृत्‍यसराव करण्‍यासाठी बळ आणि ऊर्जा दे.’ नंतर मी नृत्‍यसरावाला आरंभ केला. नंतर मला लक्षात आले, ‘ज्‍या नृत्‍यसरावाने मला ३ – ४ मिनिटांत थकवा यायचा, तो सराव मी ३० मिनिटे न थकता करू शकले.’ हे केवळ श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ अन् श्री भवानीमाता यांच्‍या कृपाशीर्वादातून मिळालेल्‍या ऊर्जेमुळेच शक्‍य झाले. यासाठी मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्री भवानीमाता यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘हे श्रीकृष्‍णा, हे परात्‍पर गुरुदेव, हे भवानीमाता आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ केवळ आपल्‍याच कृपाशीर्वादामुळे मला हे सगळे अनुभवता आले. माझ्‍यात नृत्‍यसराव करण्‍याची शक्‍ती नसतांनाही आपणच मला ऊर्जा देऊन आपणास अनुभवण्‍याची संधी दिलीत. यासाठी मी आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘मला सतत आपल्‍याकडूनच ऊर्जा मिळून आपली सेवा आणि भक्‍ती करण्‍याची संधी मिळत आहे’, याची मला सदैव जाणीव असू द्या. भगवंता, हीच आपल्‍या चरणी माझी कृतज्ञतारूपी प्रार्थना आहे !’

४. जन्‍माष्‍टमीच्‍या आदल्‍या दिवशी नृत्‍यसराव करतांना आलेल्‍या अनुभूती

४ अ. नृत्‍य सरावाच्‍या वेळी दुसर्‍या दिवशी श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी असल्‍यामुळे श्रीकृष्‍ण स्‍तुतीचा सराव करण्‍याचा विचार मनात येऊन त्‍याच्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती घेता येण्‍यासाठी प्रार्थना करणे : ‘५.९.२०२३ या दिवशी मी नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजता आध्‍यात्मिक संशोधन केंद्राच्‍या एका आगाशीत नृत्‍यसराव करायला गेले होते. दुसर्‍या दिवशी जन्‍माष्‍टमी असल्‍यामुळे माझ्‍या मनात सकाळपासून विचार येत होते, ‘आज नृत्‍य सरावाच्‍या वेळी ‘श्रीकृष्‍णाष्‍टकम्’ यावर नृत्‍य सराव करूया.’ नृत्‍यसरावाला आरंभ करण्‍यापूर्वी मी भगवान श्रीकृष्‍णाच्‍या चरणी प्रार्थना केली, ‘हे श्रीकृष्‍णा, माझ्‍याकडून तुला अपेक्षित असाच नृत्‍याचा सराव करवून घे. मला ही कला केवळ तुझ्‍या कृपाशीर्वादामुळेच मिळाली आहे. ही कला मला तुझ्‍या चरणी अर्पण करता येऊ दे. सराव करतांना मला तुझ्‍या अस्‍तित्‍वाची अनुभूती घेता येऊ दे’, हीच तुझ्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना आहे.’

४ आ. नृत्‍यसरावाच्‍या वेळी आकाशात आलेल्‍या केशरी आणि श्‍याम रंगांची छटा पाहून श्रीकृष्‍णाने त्‍याचे मोरपीस आकाशात फिरवून रंग दिल्‍याचे जाणवणे अन् नृत्‍याच्‍या शेवटी ध्‍यान लागणे : सराव करतांना माझे लक्ष आकाशाकडे गेले. आकाशात केशरी आणि श्‍याम (श्रीकृष्‍णाच्‍या रंगासारखी) रंगांची निराळीच छटा आली होती. आकाशाचे असे रंग मी यापूर्वी कधीच पाहिले नव्‍हते. त्‍या वेळी मला असे वाटले, ‘जणूकाही श्रीकृष्‍णाने त्‍याचे मोरपीस आभाळात फिरवून असा रंग दिला आहे.’ नृत्‍य करतांना मला मधूनच मोराचा केकारवही (मोराचे ओरडणे) ऐकू आला. त्‍या वेळी माझ्‍या मनात श्रीकृष्‍णाप्रति भाव दाटून आला आणि एका क्षणी ‘मी काय नृत्‍य करत आहे’, याकडे माझे लक्षच गेले नाही. नृत्‍यात शेवटी ‘मी बसून डोके भूमीला टेकवून नमस्‍कार करते’, अशी मुद्रा होती. त्‍या वेळी २ – ३ मिनिटे माझे ध्‍यान लागले होते.

‘हे मनोहरा, केवळ तुझ्‍या कृपेमुळेच मला हे अनुभवता आले. त्‍यासाठी मी तुझ्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तुझ्‍याप्रति कृतज्ञतेचा भाव माझ्‍या मनमंदिरात सतत असू दे’, हीच तुझ्‍या चरणी माझी कृतज्ञतारूपी प्रार्थना आहे.’

– परात्‍पर गुरुदेवांची, कु. अंजली कानस्‍कर (कथ्‍थक विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.(२३.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक