नेपाळमध्ये गोमांस खाण्याच्या संदर्भातील व्हिडिओवरून हिंसाचार !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या नेपाळगंज भागात गोमांसाचे भक्षण केल्यावरून दंगल भडकल्याने संचारबंदी लावण्यात आली आहे. येथे गोमांस खाण्याच्या संदर्भात असलेला एक व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ही दंगल भडकली. नेपाळगंज हा भारताच्या उत्तरप्रदेशला लागून असलेला भाग आहे. येथेही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

नेपाळगंजच्या धारण भागात ही घटना घडली. यानंतर येथे गायींच्या रक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला. या वेळी दगडफेक आणि हिंसाचार झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या काही मासांपासून नेपाळमध्ये धार्मिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथे सातत्याने संचारबंदी लागू करण्यात येते.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळीही भडकली होती दंगल !

मलंगवा आणि सरलाही येथे काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला होता. तेथे बरेच दिवस संचारबंदी लावण्यात आली होती. येथे श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनावरून हिंदु आणि मुसलमान यांच्यात दंगल भडकली होती. यात १२ हून अधिक जण घायाळ झाले होते. यात रूपेश यादव याच्यावर चाकूने आक्रमण केल्याने तो गंभीररित्या घायाळ झाला होता. त्याच्यावर अद्यापही उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

आता हिंदूबहुल नेपाळमध्येही धर्मांधांकडून गोहत्या आणि गोमांस यांच्या संदर्भातील घटना घडत आहेत. याला नेपाळमधील हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करून त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे !