देशभरातील सार्वजनिक शौचालये अस्वच्छ ! – सर्वेक्षणातील माहिती

नवी देहली – सामाजिक माध्यमांवरील ‘लोकल सर्कल’ या गटाने केलेल्या सर्वेक्षणात ‘देशातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ नाहीत’, असे आढळून आले आहे. या गटाने देशातील ३४१ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यामध्ये ३९ सहस्रांपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला. देशामध्ये ९ वर्षांपूर्वी गांधी जयंतीनिमित्ताने ‘स्वच्छ भारत अभियाना’ला प्रारंभ करण्यात आला; मात्र यातून वरील स्थिती अद्यापही सुधारलेली नाही, असे उघड झाले.

सर्वेक्षणात लोकांनी सांगितलेली सूत्रे

१. शहर किंवा जिल्हा येथे सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढली आहे, असे ४२ टक्के लोकांनी सांगितले; मात्र त्यांची स्थिती चांगली नसल्याचे मत ५२ टक्के लोकांनी व्यक्त केले.

२. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३७ टक्के लोकांच्या मते सार्वजनिक शौचालय साधारण किंवा कामापुरते ठीक आहे, २५ टक्के लोकांनी ते सरासरीपेक्षा वाईट, १६ टक्के लोकांना ते भयानक वाटले आणि १२ टक्के लोकांनी सांगितले की, ते इतके वाईट होते की, ते वापर न करताच बाहेर आले.

३. सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याऐवजी एखाद्या व्यावसायिक आस्थापनामध्ये जाऊन तेथील शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देऊ, असे बहुसंख्य लोकांनी सांगितले.

४. देहली, मुंबई किंवा बेंगळुरु यांसारख्या शहरांमध्ये ‘सुलभ शौचालया’सारख्या प्रतिष्ठित संस्थेने व्यवस्थापन केलेले नसेल, तर सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे एखाद्या दु:स्वप्नासारखे असते, असेही मत या सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही अशी स्थिती असेल, तर आपण स्वच्छतेच्या संदर्भात मागास आहोत, हेच जगाला दिसते !
  • जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा भारत प्रयत्न करत असतांना स्वच्छतेच्या संदर्भात ही परिस्थिती असेल, तर ते भूषणावह नाही !