भागवत वारकरी संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते २५ कीर्तनकारांचा सत्कार
आळंदी (पुणे) – कितीही संकटे आली, तरी वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्याची विचारधारा टिकवून ठेवली आहे, हे विशेष आहे. देशाच्या हितासाठी असलेली ही विचारधारा रुजवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. भागवत वारकरी संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते २५ कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले, ‘‘आज देशात एका बाजूला सनातन धर्म आणि दुसर्या बाजूला भागवत धर्म अशी चर्चा होत आहे. देशाची मूळ विचारधारा हिंदूंची, मुसलमानांची किंवा अन्य कोणतीही असो, यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाने मांडली जाते. त्याचा पुरस्कार करणे आवश्यक आहे.’’ (भारताची मूळ विचारधारा सनातन धर्माची, म्हणजेच हिंदु धर्माची आहे. ‘हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवरायांना संत तुकाराम महाराज यांनी राजधर्म पाळण्यासाठी मार्गदर्शन केले होते’, असे इतिहास सांगतो. वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी सनातन धर्म वाढावा यासाठी समाजाला शिकवण दिली आहे. त्यामुळे सनातन धर्म आणि भागवत धर्म अशी तुलना होणे अनावश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभेदाभेद वारकरी संप्रदाय करत नाही, तर राजकारणीच करतात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |