शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्‍याच्‍या करारावर आज स्‍वाक्षर्‍या होणार !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे इंग्‍लंड येथील ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियम’ मधून भारतात आणण्‍याच्‍या करारावर ३ ऑक्‍टोबर या दिवशी स्‍वाक्षर्‍या होणार आहेत. या करारासाठी सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्‍लंड येथे गेले आहेत. ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अलबर्ट म्‍युझियमचे संचालक ट्रायस्‍टम हंट यांच्‍याशी बैठक होऊन करारावर स्‍वाक्षरी होईल. करारावर स्‍वाक्षरी करण्‍यासाठी इंग्‍लंडला जातांना माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या ३५० व्‍या राज्‍याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्‍या दर्शनाला भारतात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने सामंजस्‍य करार करण्‍यास जातांना पुष्‍कळ अभिमान वाटत असल्‍याचे म्‍हटले.