सोलापूर येथे जिल्हाधिकार्यांचा ‘एक घंटा स्वच्छतेसाठी’ मोहिमेत सहभाग !
सोलापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे ‘एक तारीख एक तास’ या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहस्रो नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा परिषद परिसर आणि मंदिर परिसर येथे घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. रस्त्यावरील कचरा उचलला. यातून त्यांनी ‘घरासमवेतच परिसरही स्वच्छ ठेवा’, असे आवाहन नागरिकांना केले.
सोलापूर शहरात सिद्धेश्वर मंदिराकडील अडुसष्ठ लिंगांपैकी जिल्हा परिषद परिसरात असलेल्या एका ठिकाणाची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छता केली. या वेळी ‘स्वच्छ गाव सुंदर गाव’, ‘प्लास्टिकमुक्त गाव करा’, ‘स्वच्छ कार्यालय, सुंदर कार्यालय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जिल्हा परिषद मुख्यालयातील विभागप्रमुख आणि कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रंगभवन ते जिल्हा परिषद मार्ग, काँग्रेस भवन समोरील अडुसष्ठ लिंग परिसराची स्वच्छता केली. यासमवेतच जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचीही स्वच्छता करण्यात आली.