श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठीचे नियम

सर्व वेदवेत्‍या गुरुजनांना वंदन करून ‘महालय श्राद्ध’ विषयासंबंधीची पुढील माहिती आज आपण पाहूया. २ ऑक्‍टोबर या दिवशीच्‍या भागात आपण ‘महालय श्राद्ध, पिंडदान आणि पितरांपर्यंत कव्‍यभाग (अन्‍न) पोचण्‍याची पद्धत’, यांविषयी वाचले. आज आपण श्राद्धकाल आणि श्राद्धभूमी यांविषयी माहिती जाणून घेऊ. तसेच श्राद्ध आणि महालयात कोणते भोजन पदार्थ करावेत ? आणि कोणते पदार्थ वर्ज्‍य करावेत ? तेही पाहू.          

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/724339.html

१. श्राद्धकाल 

अ. देवकार्याणि पूर्वाह्णे मनुष्‍याणां च मध्‍यमे ।
पितृृणामपराह्णे च कार्याण्‍येतानि यत्नत: ॥

– दक्षस्‍मृति, अध्‍याय २, श्‍लोक २२ आणि २३

अर्थ : देवतांसंबंधी कार्ये (अग्‍निहोत्र, हविर्भाग इत्‍यादी) दिवसाच्‍या पूर्वार्धात, मनुष्‍याशी संबंधित कार्ये (अतिथी भोजन, दान इत्‍यादी) दिवसाच्‍या मध्‍यभागात आणि पितरांसंबंधी कार्ये (तर्पण, श्राद्ध इत्‍यादी) अपराण्‍हकाळात (दुपारनंतर) प्रयत्नपूर्वक करावीत.

आ. दिवसस्‍याष्‍टमे भागे मन्‍दीभवति भास्‍कर: ।
स काल: कुतपो ज्ञेयः पितृणां दत्तमक्षयम् ॥

– वसिष्‍ठस्‍मृति, अध्‍याय ११, श्‍लोक ३३

अर्थ : दिवसाच्‍या आठव्‍या भागात सूर्याचे तेज मंद होते, याला ‘कुतप काल’ म्‍हणतात. या वेळी श्राद्ध केले, तर पितरांची अक्षय्‍य तृप्‍ती होते.

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

इ. ‘देवलस्‍मृती’त तर ‘एकोदिष्‍ट हे मध्‍यान्‍हकाली आणि वृद्धिश्राद्ध प्रात:काली करावे’, असे म्‍हटले आहे. ‘लघुहारीतस्‍मृती’तही असे म्‍हटले आहे की, पंडित लोक ८ मुहूर्ताला (कुतप काली – अपराण्‍ह काळ) श्राद्ध करतात. ‘प्रजापतिस्‍मृती’मध्‍ये असा उल्लेख आहे, ‘जर वार्षिक श्राद्धाची तिथी २ दिवस असेल, तर ज्‍या दिवशी ती कुतप कालात मिळत असेल, त्‍या दिवशी श्राद्ध करावे. कुतप काळ म्‍हणजे अपराण्‍ह काळ. श्राद्ध आणि महालय यांच्‍याकरता हा काळ प्रशस्‍त मानला आहे. हा काळ कसा पहायचा ? ते सांगतो. सूर्योदय ते सूर्यास्‍त या काळास ‘दिनमान’ म्‍हटले आहे. या दिनमानाचे समान ५ भाग करावे, त्‍यातील चौथा भाग हा अपराण्‍ह काळ असतो.

२. श्राद्धाकरता पवित्र देश (स्‍थाने)

अ. अवकाशेषु चोक्षेषु जलतीरेषु चैव हि ।
विविक्‍तेषु च तुष्‍यन्‍ति दत्तेन पितर: सदा ॥

– मनुस्‍मृति, अध्‍याय ३, श्‍लोक २०७

अर्थ : ‘जो प्रदेश स्‍वभावतः शुद्ध, पवित्र आहे, नदी वा सरोवराच्‍या तीरावर आहे, जेथे वर्दळ नाही, अशा स्‍थानी श्राद्ध केले असता पितर संतुष्‍ट होतात.’ स्‍वाभाविक पवित्र वनादी देशात नदी किनारी, एकांतात श्राद्ध केल्‍याने पितर संतुष्‍ट होतात.

आ. ‘यद्ददाति गयास्‍थश्‍च सर्वमानन्‍त्‍यमश्‍नुते ।’ (याज्ञवल्‍क्‍यस्‍मृति, अध्‍याय १, श्‍लोक २६१), म्‍हणजे ‘गयातीर्थावर श्राद्ध केल्‍याने पितरांची अनंत काळापर्यंत तृप्‍ती होते.’

इ. ‘शंखस्‍मृती’च्‍या १४ व्‍या अध्‍यायात दिलेली काही स्‍थाने

इ १. यद्ददाति गयाक्षेत्रे प्रभासे पुष्‍करे तथा ।
प्रयागे नैमिषारण्‍ये सर्वमानन्‍त्‍यमश्‍नुते ॥

– शङ्‍खस्‍मृति, अध्‍याय १४, श्‍लोक २७

अर्थ : गया, प्रभास, पुष्‍कर, प्रयाग, नैमिषारण्‍य येथे श्राद्ध केले असता पितरांची अनंत काळापर्यंत तृप्‍ती होते.

इ २. गङ्‍गायमुनयोस्‍तीरे पयोष्‍ण्‍याभरकण्‍टके ।
नर्मदायां गयातीरे सर्वमानन्‍त्‍यमुच्‍यते ॥

– शङ्‍खस्‍मृति, अध्‍याय १४, श्‍लोक २८

अर्थ : गंगा, यमुना, पयोष्‍णी, अमरकंटक, नर्मदा, गया येथे तीरावर श्राद्ध केले असता पितरांची अनंत काळापर्यंत तृप्‍ती होते.

इ ३. वाराणस्‍यां कुरुक्षेत्रे भृगुतुङ्‍गे महालये ।
सप्‍तवेण्‍यृषि कूपे च तदप्‍यक्षय्‍यमुच्‍यते ॥

– शङ्‍खस्‍मृति, अध्‍याय १४, श्‍लोक २९

अर्थ : महालय पक्षात वाराणसी, कुरुक्षेत्र, भृगुतुंग तीर्थावर, तसेच सप्‍तवेणी आणि ऋषिकूपाच्‍या ठिकाणी जे श्राद्ध केले जाते, त्‍याचे फळ अक्षय्‍य असते.

गंगा, प्रभास, पुष्‍कर, प्रयाग, नैमिषारण्‍य, अमरकंटक, काशी, कुरुक्षेत्र, भृगुतुंग तीर्थावर, तसेच महालय पक्षात गंगा, यमुना, पयोष्‍णी, नर्मदा, सप्‍तवेणी आणि ऋषिकूपाच्‍या तीरावर जे श्राद्ध केले जाते, त्‍याचे फळ हे अक्षय्‍य असते.

ई. ‘प्रजापतिस्‍मृती’मध्‍ये आणखी माहिती दिली आहे, ती पाहू.

ई १. सरित्‍समुद्रतोयैक्‍ये वापीकूपसरित्तटे ।
देवजुष्‍टे च सम्‍प्राप्‍ते देशे श्राद्धे गृहान्‍तरे ॥

– प्रजापतिस्‍मृति, श्‍लोक ५३

अर्थ : नदी आणि समुद्राचा संगम होतो त्‍या ठिकाणी, विहीर, तळी, नदीतीरी, मंदिरात, श्राद्धाला उपयुक्‍त प्रदेशात, तसेच घरातही श्राद्ध करता येते.

ई २. धात्रीबिल्‍ववटाश्‍वत्‍थमुनिचैत्‍यगजान्‍विना ।
श्राद्धं छायासु कर्तव्‍यं प्रासादाद्रौ महावने ॥

– प्रजापतिस्‍मृति, श्‍लोक ५४

अर्थ : या पृथ्‍वीतलावर बेल, वड, पिंपळ, अगस्‍त्‍य अथवा प्रसिद्ध वृक्षांच्‍या छायेत, प्रासादात, पर्वत अथवा महावनात श्राद्ध करावे.

एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या घरात जागेचा अभाव असतो; परंतु श्राद्धपक्ष करण्‍याची मनात भावना असते, तेव्‍हा शास्‍त्रकारांनी वरील पर्याय उपलब्‍ध करून दिले आहेत.

३. श्राद्धाचा स्‍वयंपाक करतांना कोणत्‍या पदार्थांचा वापर करू नये ? आणि कोणते पदार्थ करावेत ?

श्राद्धाचा स्‍वयंपाक करतांना कोणत्‍या पदार्थांचा वापर करू नये ? आणि कोणते पदार्थ करावेत ? हेही ‘स्‍मृतिग्रंथा’त दिले आहे. तेही आपण पाहू.

अ. वर्ज्‍य पदार्थ : म्‍हशीचे दूध, हरभरे चणे, कोहळा, लाल भोपळा, मसूर, कांदा, लसूण, वांगी, ओवा, पडवळ, हिंग, गाजर, कोथिंबीर, ओवा, चारोळी हे पदार्थ वर्ज्‍य करावेत.

आ. पितरांना प्रिय पदार्थ : खीर, दही यांच्‍या करता गायीचे उत्तम दूध, उडीद डाळ, मूग, गहू, तळलेले पदार्थ, वडे, पुरी वगैरे आणि मध हे पितरांना अधिक प्रिय आहेत.

अगोधूमं च यच्‍छ्राद्धं माषमुद़्‍गविवर्जितम् ।
तैलपक्‍वेन रहितं कृतमप्‍यकृतं भवेत् ॥

अर्थ : ज्‍यात गहू, उडीद, मूग, तळलेले पदार्थ नसतील, तर असे श्राद्ध करूनही न केल्‍यासारखेच आहे.

हे पदार्थ श्राद्ध भोजन न योजल्‍यास ते श्राद्ध केले, तरी न केल्‍याप्रमाणेच होईल. दुर्गंध आणि केस युक्‍त पाणी टाळावे. शिळेपाणीही श्राद्ध स्‍वयंपाकास वर्ज्‍य आहे.

४. श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठी काही नियम

अ. श्राद्ध दिन आणि तत्‍पूर्व दिन स्‍त्रीसंग वर्ज्‍य करावा.

आ. दुसर्‍यांदा भोजन करू नये.

इ. सकाळी क्षौर (दाढी करणे, केस कापणे) करू नये, मोठ्या आवाजात बोलू नये, जोरजोरात हसू नये, गळ्‍यात माळा, अलंकार घालू नयेत.

ई. दिवसा झोपू नये.

उ. अतिथीस श्राद्धापूर्वी भोजन वाढू नये.

ऊ. मुक्‍तकेशा म्‍हणजे केस सोडून स्‍वयंपाक करू नये किंवा वाढूही नये. स्‍वच्‍छ (कासोटायुक्‍त नऊवार साडी) ही स्‍वयंपाक करण्‍यास आणि वाढण्‍यास प्रशस्‍त आहे.

ए. उपाहारगृह किंवा आचारी यांचा स्‍वयंपाक श्राद्धाकरता योजू नये. (स्‍वयंपाक या शब्‍दात स्‍वयम् म्‍हणजे स्‍वत: कुटुंबियांनी केलेले अन्‍न अभिप्रेत आहे) त्‍यात सात्त्विकता आणि आपुलकी असते, तिच पितरांना प्रिय आहे.

५. ऋषिमुनींची महानता

आर्य सनातन हिंदु धर्माचे हेच वैशिष्‍ट्य आहे की, जवळपास ६० पेक्षा अधिक स्‍मृतिग्रंथ आपल्‍या मार्गदर्शनाकरता ऋषिमुनींनी रचले आहेत. श्राद्धाकरता एवढे पर्याय (श्राद्धाचे प्रकार, स्‍थल, काल, अन्‍न यांवर) आणि विपुल लेखन या मंडळींनी केले आहे. आता आपण ‘श्राद्धाकरता घरात जागा नाही’, असे सांगणार्‍यांना हे एवढे पर्याय देऊ शकतो. जो खरोखर आस्‍तिक धर्मप्रेमी आहे, तो यामुळे नक्‍कीच संतुष्‍ट होईल आणि आपल्‍या पूर्वजांचे श्राद्ध करून त्‍यांचे आशीर्वाद नक्‍की प्राप्‍त करील, यात संशय नाही.

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (२८.९.२०२३)