नवी मुंबई, १ ऑक्टोबर (वार्ता.) – बेलापूर-पनवेल जंबो मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (‘एन्.एम्.एम्.टी.’च्या) माध्यमातून विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर उपक्रमाकडून २८ बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे उपक्रमाला सवा दोन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त होणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी दिली.
१. पनवेल ते बेलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी ३० सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत ३८ घंटे लोकल सेवा बंद आहे.
२. या मेगाब्लॉकच्या काळात खारघर रेल्वे स्थानक येथून सुटणार्या सर्व बसचे संचलन (वाहतूक) बंद करून ते बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करण्यात आले आहे.
३. बेलापूर येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वेस्थानक येथून नियमितच्या बस चालूच आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते बेलापूर रेल्वेस्थानकांच्या दरम्यान उपक्रमाकडून अतिरिक्त २८ बस उपलब्ध केल्या आहेत. पहाटे ५.३० ते रात्री ११ या वेळेमध्ये प्रत्येकी ५ मिनिटांनी बस सेवा चालू आहे, अशी माहिती मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी दिली.
४. पनवेल स्थानक येथे प्रत्यक्ष पहाणी केली असता प्रशासनाकडून पनवेल-बेलापूर या मार्गावरील बस संचालन उत्तम प्रकारे हाताळण्यात आले होते. असे असले, तरी पनवेल ते दादर येथे जाणारे अनेक प्रवासी होते; मात्र दादरला जाणारी १०३ क्रमांकाची बस बंद करण्यात आल्याचे उपक्रमाच्या कर्मचार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी एस्.टी.ने प्रवास करावा. पनवेल-ठाणे या बसची संख्या वाढवली नसल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली होती.