पणजी, ३० सप्टेंबर (वार्ता.) : गोव्यात एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा (आय.ए.एस्.) यांनी दिली आहे. वर्ष २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेतल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला भाजप, काँग्रेस, आप आणि गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत राजकीय पक्षांनी मुख्य निवडणूक अधिकार्यांना सांगितले की, एप्रिल मासातील एका आठवड्यात गोव्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते आणि यामुळे एप्रिल मासात निवडणूक घेणार असल्यास या सूत्राकडे लक्ष द्यावे. वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणूक गोव्यात एप्रिल मासातच घेतली होती. ‘टपालांद्वारे करण्यात येणार्या मतदानाचा दुरुपयोग होऊन त्याचा विशिष्ट पक्षाला लाभ होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने टपाल मतदानावर कठोरपणे देखरेख ठेवावी’, अशी मागणी राजकीय पक्षांनी या वेळी केली. ४ ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (‘ई.व्ही.एम्.’) आणि ‘व्ही.व्ही.पी.ए.टी.’ या यंत्रांची पहिल्या स्तरावरील तपासणी होणार आहे. याविषयी बैठकीत माहिती देण्यात आली, तसेच निवडणुकीसाठी लागू होणार्या आचारसंहितेवरही चर्चा झाली.
(सौजन्य : THE TRUE GOA NEWS)
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिर यांचे आयोजनमुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा म्हणाले, ‘‘मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोग वन खात्याच्या सहकार्याने फळ देणारी झाडे आणि औषधी वनस्पती यांच्या रोपांचे वाटप करणार आहे, तसेच वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. राज्यातील १ सहस्र ७२६ मतदान केंद्रांच्या बाहेर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या दोन्ही उपक्रमांमुळे मतदानाची टक्केवारी २ टक्यांनी वाढण्याची शक्यता आहे.’’ उमेदवारांच्या निवडीवर सार्वजनिक स्वरूपात चर्चा घडवून आणण्याचे आवाहनही निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना केले आहे. |