‘गंगावेस ते पंचगंगा नदी’ हा मिरवणूक मार्ग चालू करावा ! – किशोर घाटगे, शिवसेना, उपजिल्‍हाप्रमुख

सौजन्य: तारा न्यूज

कोल्‍हापूर – येथील गणेशोत्‍सवातील विसर्जन मिरवणुकीसाठी ‘मिरजकर तिकटी ते पंचगंगा नदी’ हा पारंपरिक मार्ग होता. कोरोना महामारीच्‍या काळात सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य केले आणि इराणी खण, काळी खण येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गेल्‍या वर्षापासून प्रशासनाने मिरजकर तिकटी ते गंगावेस हा नवा निवडणूक मार्ग घोषित केला. यामुळे मंडळांची गैरसोय होत आहे. तरी ज्‍यांनी शाडूच्‍या मूर्ती बसवल्‍या आहेत, त्‍यांना तसेच बुधवार पेठ-शुक्रवार पेठ येथील लहान मूर्ती बसवणार्‍या मंडळांसाठी ‘गंगावेस ते पंचगंगा नदी’, हा मिरवणूक मार्ग चालू करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

श्री. घाटगे यांनी पत्रकात म्‍हटले आहे की, २१ फुटी किंवा त्‍यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करावे. प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि त्‍याचसमवेत पंचगंगा घाटावर युद्धपातळीवर सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात.