श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता मूर्तीदान करण्याचे आळंदी नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे.

पुणे – आळंदी नगर परिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अभियानाच्या अंतर्गत जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरात एकूण ६ मूर्ती संकलन केंद्रांचे नियोजन केले आले. सर्व नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता नगर परिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तीदान करावे, असे आवाहन आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

केंद्रे यांनी सांगितले की,

१. या मूर्तींचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच रहातात. परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जिवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. (श्री गणेशमूर्ती शाडूमातीची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. अशा मूर्तींमुळे जलप्रदूषण होण्याचा प्रश्नच येत नाही. कारखान्यातील रसायनयुक्त दूषित पाणी, बकरी ईदच्या वेळी जनावरांचे रक्त, मांसाचे तुकडे पाण्यात मिसळले जातात. त्या वेळी पाण्यातील जिवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत नाही का ? – संपादक) त्यामुळे आळंदी नगर परिषद मागील काही वर्षांपासून ‘मूर्तीदान’ ही संकल्पना राबवत असून यास समस्त आळंदीकरांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. (प्रदूषणाच्या काळजीचा देखावा करणारे प्रशासन भाविकांची फसवणूक करत असून अशा कुठल्याही फसवणुकीला बळी न पडता श्री गणेशभक्तांनी नैसर्गिक जलस्रोतातील वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. – संपादक)

२. नगर परिषदेच्या वतीने सिद्ध केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधीवत् आरती करून श्री गणेशमूर्ती व्यवस्थितरित्या जमा केल्या जातात आणि या मूर्ती पुढे पुनर्वापरासाठी सेवाभावी संस्थांना दिल्या जातात. (मूर्ती विसर्जन न करता त्यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्य आहे. भाविकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कुणी दिला ? – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. गणेशभक्तांनीच दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे काय होते ? याचे वास्तव जाणून धर्मभावना दुखावणार्‍या आळंदी नगर परिषदेला जाब विचारला पाहिजे.