भवनाच्‍या माध्‍यमातून सहस्रो वारकरी सिद्ध करणार ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्‍यक्ष, अ.भा.वारकरी संप्रदाय

सोलापूर येथे वारकरी भवनाचे भूमीपूजन उत्‍साहात !

सोलापूर – प्रभाग क्रमांक ६ मधील गडदर्शन सोसायटी शेजारी भव्‍य वारकरी भवन बांधण्‍याच्‍या कामाचा भूमीपूजन सोहळा १६ सप्‍टेंबर या दिवशी पार पडला. यासाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न करून १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करून घेतला आहे. श्री श्री श्री १००८ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्‍वामी यांच्‍या शुभहस्‍ते हे भूमीपूजन करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्‍थानचे सहअध्‍यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर होते. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, भागवत चवरे महाराज यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्‍थित होते.  वारकरी भवनात प्रवेश केल्‍यानंतर दर्शनी भागात ५० फूट उंच श्री विठ्ठलाची मूर्ती असेल. त्‍याच ठिकाणी बाजूला २५ फूट उंचीचा भक्‍ती संप्रदायाचा भगवा ध्‍वज उभा केला जाणार आहे.

वारकरी भवनाच्‍या माध्‍यमातून वारकर्‍यांच्‍या प्रश्‍नाला वाचा फोडण्‍यात येणार आहे, तसेच या माध्‍यमातून सहस्रो वारकरी सिद्ध करण्‍याचा मानस असल्‍याचे सुधाकर इंगळे महाराज यांनी या प्रसंगी सांगितले.