विघ्‍नहर्त्‍याचे शुभागमन !

श्री गणेश

‘गणपति बाप्‍पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, हा जयघोषचालू झाल्‍यावर लक्षात येते की, गणरायाच्‍या आगमनाचा काळ जवळ आला आहे. आज श्री गणरायाचे वाजतगाजत घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या मंडपात शुभागमन होत आहे अन् ते पुढील दीड दिवसांपासून ११ आणि काही ठिकाणी २१ दिवसांसाठी स्‍थानापन्‍न होणार आहेत. आपले जीवन, कुटुंब, समाज, राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या वाटचालीत असंख्‍य विघ्‍ने, अडचणी ‘आ’ वासून उभ्‍या आहेत. प्रत्‍यक्षात मानवजातीच्‍या उद्धारासाठी श्री गणेशतत्त्व वर्षभर कार्यरत असतेच; मात्र श्री गणेशचतुर्थीच्‍या काळात सहस्रो पटींनी कार्यरत असते, हाच मुख्‍य भेद आहे. या गणेशतत्त्वाचा लाभ आपल्‍याला उत्‍सवाच्‍या कालावधीत अधिकाधिक प्रमाणात करून घ्‍यायचा आहे.

हिंदूंच्‍या सणांवर विघ्‍न !

वैयक्‍तिक जीवनात विघ्‍ने प्रत्‍येकानुसार भिन्‍न भिन्‍न असू शकतात, कौटुंबिक अडचणी वेगळ्‍या असू शकतात; मात्र समाज, राष्‍ट्र आणि धर्म यांसमोरील अडचणी, विघ्‍ने मात्र सामायिक आहेत. हिंदु सणांच्‍या वेळी येणारे सर्वांत मोठे विघ्‍न, म्‍हणजे हिंदु सणांमुळे प्रदूषण होते, असा कांगावा करणारे तथाकथित पुरो(अधो)गामी ! गणेशोत्‍सवाच्‍या वेळी जो, तो येतो आणि सांगतो, ‘प्रदूषणमुक्‍त उत्‍सव साजरा करू’, ‘पर्यावरणपूरक उत्‍सव करू !’, यामुळे जणू ‘गणेशोत्‍सवामुळे प्रदूषण होते’, असाच संदेश जाऊन एक प्रकारे उत्‍सव अपकीर्त होत आहेत. ‘शाडूमाती आणि प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस यांच्‍या मूर्ती नदी अथवा वहात्‍या जलस्रोतात विसर्जित केल्‍या, तर प्रदूषण होत नाही’, असे याविषयी अभ्‍यास करणार्‍या संस्‍थांचे म्‍हणणे आहे. एकीकडे सरकार शाडूमाती किंवा पर्यावरणपूरक मूर्ती यांचा आग्रह धरत आहे, हे चांगलेच आहे; मात्र पर्यावरणपूरकच्‍या नावाखाली कागदी लगद्याच्‍या सिद्ध केलेल्‍या मूर्ती जलस्रोताचे प्रदूषण करणार्‍या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रतिदिन रासायनिक कारखाने, अन्‍नधान्‍यावर प्रक्रिया करणारे उद्योग, सिमेंट, पशूवधगृहे यांमधून बाहेर पडणारे पाणी अनेक ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. खरे प्रदूषण तर त्‍यातून होते; मात्र ऐन गणेशोत्‍सवात प्रदूषणाची टिमकी वाजवली की, काहींनी ‘पर्यावरणरक्षक’ ही बिरुदावली फुकटची मिळत असावी, म्‍हणून ‘चमकोगिरी’ केली जाते का ?’, असा प्रश्‍न आहे. अशांना श्री गणेशाने सद़्‍बुद्धी द्यावी.

सनातन धर्मीय संकटात

गेल्‍या काही दिवसांपासून दुसरे मोठे संकट सनातन धर्मावर घोंगावू लागले आहे, ते म्‍हणजे सनातन धर्मविरोधकांचे ! ‘सनातन धर्म नष्‍ट करू, तो डेंग्‍यू, मलेरियाप्रमाणे आहे’, ‘श्री रामचरितमानस विष आहे’, अशी अत्‍यंत विखारी वक्‍तव्‍ये करणार्‍यांची जणू फळीच उभी राहिली आहे आणि त्‍यामध्‍ये सहभागी होणार्‍यांची संख्‍या वाढत आहे. त्‍यांना तथाकथित पुरो(अधो)गामी विचारवंत खतपाणी घालून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेत आहेत. कथित द्रविडस्‍तान म्‍हणून तमिळनाडूची ओळख तेथील जे सनातन धर्मद्वेषी करून देत आहेत, तेथे ऐन गणेशोत्‍सवातच श्री गणेशमूर्तींच्‍या कारखान्‍यांना टाळे ठोकल्‍याने मूर्तींच्‍या अभावी शेकडो गणेशभक्‍तांना गणेशोत्‍सवच साजरा करता येणार नाही. बहुसंख्‍य हिंदूंच्‍या भारतात आणि तेही अद्वितीय हिंदु मंदिरे असणार्‍या तमिळनाडूमध्‍ये तेथील हिंदुद्वेषी शासनकर्त्‍यांमुळे हिंदूंवर ही वेळ यावी, हे संतापजनक आहे. हे सनातन धर्मद्वेषी हिंदूंची स्‍थिती किती भयावह करतील ? हे त्‍याचेच एक उदाहरण ! हिंदू हे सहिष्‍णु वृत्तीचे असल्‍याने भारतीय राज्‍यघटनेने त्‍यांना दिलेल्‍या धर्मस्‍वातंत्र्याच्‍या अधिकारावरच गदा येत असतांना ते हिंसक न होता संयत मार्गानेच निषेध नोंदवत आहेत, हे शासनकर्त्‍यांनी लक्षात घ्‍यावे.

अगदी २ दिवसांपूर्वी गुजरातमधील खेडा येथे निघालेल्‍या भगवान शिवाच्‍या मिरवणुकीवर मशिदीतून दगडफेक करण्‍यात आली. यामध्‍ये अनेक हिंदु भाविक घायाळ झाले, तर १७ मुसलमानांना अटक करण्‍यात आली. यापूर्वी नवी देहली, मध्‍यप्रदेश, हरियाणातील नूंह या ठिकाणी हिंदूंच्‍या मिरवणुकांवर दगडफेक करण्‍यात आली. नूंह येथील मिरवणुकीच्‍या वेळी तर हिंदूंवर गोळीबार करण्‍यात आला. यामध्‍ये काही हिंदु भाविकांचा मृत्‍यूही झाला. ‘हिंदूंच्‍या देशात धार्मिक मिरवणुका काढण्‍यास भय उत्‍पन्‍न व्‍हावे आणि त्‍या बंद व्‍हाव्‍यात’, हा यामागील छुपा हेतू दिसतो.

आतंकवादाचे उच्‍चाटन हवे !

पुणे येथे आतंकवादी कारवायांचा मोठा कट पोलिसांनी उघडकीस आणून नष्‍ट केला. आतंकवादी कटात सहभागी असलेल्‍यांची धरपकड करण्‍यासाठी राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या देशभर धाडी चालूच आहेत. त्‍यामुळे आतंकवादाशी संबंधित काही नवीन धागेदोरे हाती लागतात न लागतात, तोच जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये अनंतनाग येथे आतंकवाद्यांनी सैनिकांवर भ्‍याड आक्रमण केले. यामध्‍ये सैन्‍यातील मेजर, कर्नल अशा अधिकार्‍यांना वीरमरण आले. मूठभर आतंकवाद्यांशी लढण्‍यासाठी सैन्‍य, पोलीस यांना पुष्‍कळ वेळ द्यावा लागत आहे, तसेच अधिकार्‍यांना प्राण गमवावे लागत आहेत. जम्‍मू-काश्‍मीर येथील आतंकवाद न्‍यून झाला असला, तरी त्‍याचे समूळ उच्‍चाटन झालेले नाही. तो पुन्‍हा डोके वर काढू लागला आहे. आतंकवादाचा निर्माता पाक आणि भारतीय भूभाग गिळंकृत करण्‍यासाठी टपलेला कपटी चीन यांचे मोठे विघ्‍न भारतासमोर आहे, ते गणरायाने दूर करावे. भारताच्‍या अंतर्गत परिस्‍थितीचा विचार करता देशात जातीयवादाचे निर्मूलन न होता जातीयवाद वाढत आहे. हिंदूंच्‍या प्रभावी संघटनशक्‍तीची विविध जिहादांविरुद्ध लढण्‍याची आवश्‍यकता असतांना हिंदू जातीयवादामुळे कमकुवत होत आहेत. उद्या देशात धर्मांधांनी एकदम उठाव केल्‍यास कमकुवत संघटन असणारे हिंदू तग धरून राहू शकतील का ? त्‍यामुळे हिंदू आणि भारत यांच्‍यासमोरील ही संकटे दूर करण्‍यासाठी आता विघ्‍नहर्त्‍यालाच साकडे घालूया !

सनातन धर्म आणि भारत यांच्‍यावरील विघ्‍ने अन् जिहादी संकटे दूर करण्‍यासाठी विघ्‍नहर्त्‍याला शरण जाऊया !