‘एच्.एम्.पी.व्ही.’च्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारचे कृती दल स्थापन !

मुंबई – एच्.एम्.पी.व्ही. या साथरोग आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने ‘कृती दला’ची स्थापना केली आहे. यामध्ये जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्य असणार आहेत.

या कृतीदलामध्ये जे.जे. रुग्णालयातील बालरोगचिकित्साशास्त्र विभागातील प्राध्यापक, पुण्याच्या बी.जी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक, छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागातील प्राध्यापकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यामध्ये या विषाणूचे रुग्ण सापडू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत, तसेच नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.