महाराष्ट्रात गेल्या ३ तीन वर्षांत ११ लाख ९ सहस्र ७६० लोकांना भटक्या कुत्र्यांचा चावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महाराष्ट्रात वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांत भटक्या कुत्र्यांनी ११ लाख ९ सहस्र ७६० लोकांना चावा घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये या घटनांमध्ये वाढ झाली होती. ग्रामीण भागांतील अशा घटनांची नोंदच होत नाही. त्यामुळे ही संख्या अधिक असू शकते.

भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पशूसंवर्धन विभागाने कायदा केला असून त्याची कार्यवाही स्थानिक प्राधिकरणांना करायची आहे. यात प्रामुख्याने भटक्या श्‍वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीची शस्त्रक्रिया करणे, यांवर अधिक भर देण्यात आला आहे. भटका कुत्रा चावल्यास होणार्‍या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी विशेष कार्ययोजनाही सिद्ध करण्यात आली आहे; परंतु तरीही भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (प्रतिबंधात्मक गोष्टी सिद्ध करूनही चावा घेण्याचे प्रमाण वाढत असणे याचा अर्थ उपाययोजनांची अपेक्षित फलनिष्पत्ती मिळण्यात काहीतरी त्रुटी रहात आहेत. त्यांचाही अभ्यास करून कार्यवाही करणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असतील ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !