देशविघातक काँग्रेस ! 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

मध्‍यप्रदेशात या वर्षाच्‍या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आमचे सरकार आल्‍यावर काँग्रेस मध्‍यप्रदेशमध्‍ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे. यावरून काँग्रेस ‘जातनिहाय गणना’ हे प्रचाराचे सूत्र करण्‍याची शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे. जातपात न मानणार्‍या किंवा भाजपला जातीयवादी ठरवणार्‍या काँग्रेसनेच असे सूत्र उपस्‍थित करावे, हे आश्‍चर्यकारक निश्‍चितच नाही; कारण ‘भाजप सरकार जातनिहाय गणनेस अनुकूल नसतांना काँग्रेसने उचललेले हे सूत्र म्‍हणजे ‘विरोधकांचा हा धूर्त प्रयत्न असू शकतो’, हे नाकारता येणार नाही. अर्थात् ‘या जातनिहाय गणनेची आवश्‍यकता खरोखरच आहे का ?’, हा प्रश्‍न पुन्‍हा एकदा निर्माण होतो. आतापर्यंत या विषयावर अनेकदा चर्वितचर्वण झालेले आहे; परंतु असे असतांनाही खर्गे यांनी हे सूत्र निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर पुन्‍हा उकरून काढणे यामागील त्‍यांच्‍या सुप्‍त कारस्‍थानाचा गांभीर्याने विचार करायला हवा. ‘निवडणुकांमध्‍ये जिंकण्‍याच्‍या ईर्ष्‍येपोटीच जनतेला जातीपातीत विभागण्‍याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे’, असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही. जातनिहाय गणना करायची कि नाही ? हा निर्णय घेण्‍याचा अधिकार सर्वस्‍वी केंद्रशासनाकडे आहे; मात्र असे असतांना स्‍वतःच निवडणुकीपूर्वी अशा स्‍वरूपाचा निर्णय घोषित करणे, हे राज्‍यघटनाविरोधी नव्‍हे का ? केंद्र सरकार अशांच्‍या विरोधात कारवाई करणार का ?

जातीपातीची कुबडी घेणारा काँग्रेस पक्ष !

सध्‍या देशात भाजप हा पक्ष बलवान ठरत आहे. भविष्‍यातील निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवर केली जाणारी चढाओढ पहाता काँग्रेसला बळकटी देण्‍यासाठी त्‍या पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत; पण त्‍यासाठी अशा निर्णयाप्रत का यावे लागले ? स्‍वबळावर कोणतीही निवडणूक लढवणे काँग्रेसला सध्‍या शक्‍यच नाही; कारण काँग्रेसकडे ‘स्‍व’बळच उरलेले नाही. त्‍यामुळे ‘काँग्रेस पुन्‍हा एकदा या माध्‍यमातून जातीय राजकारण उकरून काढत आहे’, असेच प्रकर्षाने लक्षात येते. काँग्रेस सध्‍या मरणासन्‍न अवस्‍थेत आहे. त्‍यामुळे ‘काय केले की, सर्व जातींचे आपल्‍याला तुष्‍टीकरण साधता येऊन त्‍यांचा मतपेटीसाठी लाभ होऊ शकतो ?’, याचा काँग्रेसने बारकाईने विचार केलेला आहे. ‘मध्‍यप्रदेश आणि कर्नाटक येथील निवडणुकांचा निकाल पहाता आपल्‍याकडेही याची पुनरावृत्ती व्‍हावी, यासाठी जातीयतेची कुबडी घ्‍यावी लागणार’, हे काँग्रेसला लक्षात आल्‍यानेच त्‍याच्‍याकडून अशी घोषणा केली गेली आहे. जातीय गणना झाली, तर त्‍यातून त्‍याचा हा हेतू बर्‍यापैकी प्रमाणात साध्‍य होऊ शकतो. याद्वारे ‘भाजपला टक्‍कर देता येईल आणि त्‍याच्‍या एक पाऊल पुढे जाता येईल’, ही त्‍यातील मेख लक्षात घ्‍यायला हवी. असे जरी असले, तरी ही गणना झाल्‍यास आरक्षणाचा आगडोंब उसळेल; कारण सध्‍या काही समाजघटकांसाठी देशात आरक्षणाची प्रक्रिया लागू आहे. त्‍या प्रक्रियेला अनेक फाटे फुटू शकतात. ज्‍या जाती अल्‍पसंख्‍यांक असल्‍याचे आढळेल, त्‍यांच्‍याकडूनही आरक्षणाच्‍या मागणीचा उच्‍चार होऊ शकतो. जातीभेद, द्वेष यांची बीजे पुन्‍हा निर्माण होऊन त्‍यांचे प्रमाण वाढत जाईल. सर्वच क्षेत्रांत एकमेकांकडे जातीच्‍या चष्‍म्‍यातून पाहिले जाईल. यामुळे दुजाभाव, भेदभाव केला जाऊ शकतो. ही गणना एखाद्या समाजघटकासाठी लाभदायक किंवा कल्‍याणकारी ठरणार असली, तरी दुसर्‍या समाजघटकासाठी ती हानीकारकही ठरू शकते. कुणाला न्‍याय मिळेल, तर कुणाला अन्‍याय सहन करायला लागेल. थोडक्‍यात काय, तर जातीयवादी राजकारणाला ऊत येईल. याचा परिणाम संपूर्ण देशावर होईल. त्‍यामुळे जातीनिहाय गणना करणे म्‍हणजे एकसंध होत असणार्‍या देशाला एक प्रकारे तोडण्‍याचा केला जाणारा प्रयत्न होय ! हाच प्रयत्न काँग्रेसी करत आहेत. या सर्व प्रक्रियेला सरकार कसे सामोरे जाणार आहे ? काँग्रेसींना कधी शहाणपणा येईल का ? हा प्रश्‍नच आहे. त्‍यामुळे सारासार विचार न करता केवळ स्‍वार्थी हेतूने मध्‍यप्रदेशच्‍या निवडणुकांच्‍या दृष्‍टीने जातीच्‍या संदर्भातील विधान करून देशविघातक निर्णय घेऊ पहाणार्‍या काँग्रेसींना सरकारनेच विरोध करावा !

एरव्‍ही कधीही जातीचे सूत्र उपस्‍थित झाले की, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी सगळे बळ एकवटून त्‍याला विरोध करतात; पण खर्गे यांनी उपस्‍थित केलेल्‍या सूत्राला विरोध करण्‍यासाठी कुणीही पुढे आले नाही, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मोदीद्वेषाने भरलेली काँग्रेस !

 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्‍त विधाने केली आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘राफेल’ लढाऊ विमानाचे शस्‍त्रपूजन करतांना त्‍याच्‍या टायरखाली लिंबू ठेवले होते; पण खर्गे यांनी ‘अशा प्रकारच्‍या तमाशाची आवश्‍यकता नाही’, असे म्‍हटले होते. ‘नरेंद्र मोदी विषारी सापासारखे आहेत. ‘ते विषारी नाहीत’, असे तुम्‍हाला वाटत नसेल, तर त्‍यांना स्‍पर्श करून बघा. त्‍यांना स्‍पर्श केला, तर तुम्‍ही मरून जाल’, असे अकलेचे तारे तोडणारी विधाने मध्‍यंतरी खर्गे यांनी केली होती. राजकारणात काय बोलावे ? आणि काय बोलू नये ? हेही आता काँग्रेसला कळेनासे झाले आहे. याचे मूळ केवळ मोदीद्वेषात आहे. हा मोदीद्वेष त्‍यांच्‍या नसानसात भरलेला आहे. निवडणुकांच्‍या पार्श्‍वभूमीवरील खर्गे यांच्‍या विधानालाही मोदीद्वेषाचीच किनार आहे. नागरिकांच्‍या कल्‍याणासाठी नव्‍हे, तर जातीयवादी मानसिकता बाळगून निवडणूक लढवणे, सत्तेची अभिलाषा बाळगणे यांसाठी हपापलेल्‍या काँग्रेसला मध्‍यप्रदेशमधील जनतेनेच निवडणुकीत धडा शिकवायला हवा. निवडणुकीसाठी काँग्रेसचा पाया हा केवळ न केवळ मतदारांचे तुष्‍टीकरण, लांगूलचालन अन् लाळघोटेपणा करणे हाच होता, आहे अन् राहीलही ! त्‍यात कालौघात पालट होणे कदापि शक्‍य नाही. गेल्‍या काही वर्षांपासून केवळ हानीच सहन करावी लागणार्‍या आणि बलहीन झालेल्‍या राजकीय पक्षाचा डोलारा कधीतरी टिकून राहील का ? अशा राजकीय पक्षाचे भवितव्‍य उज्‍ज्‍वल होईल का ? असा पक्ष रसातळालाच जाणार ! यानिमित्ताने काँग्रेसचा जातीयवादी चेहरा जनतेसमोर उघडा पडला आहे. मध्‍यप्रदेशमधील जनतेने काँग्रेसचे खरे रूप लक्षात घेऊन मतदानाचे योग्‍य कर्तव्‍य बजावावे !

जातनिहाय गणना म्‍हणजे एकसंध होऊ पहाणार्‍या देशाला तोडण्‍यासाठीच केला जाणारा प्रयत्न !