सुशिक्षित तरुणांना नाईलाजाने चहा आणि पानटपर्‍यांवर करावी लागते उपजीविका !

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अहवालातून उघड झाली गंभीर स्थिती

ए आय निर्मित चित्र

छत्रपती संभाजीनगर – राज्यात रोजगारात वाढ झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’च्या (‘एन्.एस्.ओ’च्या) वर्ष २०२५ च्या अहवालातून या दाव्यांचे खंडण झाले आहे. राज्यातील लाखो सुशिक्षित तरुण सध्या नोकर्‍यांअभावी चहाच्या टपर्‍या, शिवणकामांची दुकाने आणि पानटपर्‍या चालवून अत्यंत गरिबीत उपजीविका करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

अहवालातील मुख्य सूत्रे अशी…

१. महाराष्ट्रात ६५ लाख ६५ सहस्र असंघटित आस्थापने आहेत. या क्षेत्रांत राज्यातील १ कोटी १७ लाख लोक काम करतात.

२. या क्षेत्रांतील तरुणांना भविष्य निर्वाह निधी (पी.एफ्.), वैद्यकीय विमा किंवा सुरक्षिततेचे कोणतेही कवच नाही. उत्पादक, व्यापार आणि सेवा क्षेत्रांत काम करणार्‍या तरुणांची मासिक कमाई अवघी ११ ते १२ सहस्र रुपये इतकीच आहे.

३. वार्षिक वेतनामध्ये उत्तराखंड राज्य देशात अव्वल असून महाराष्ट्र पहिल्या ३ राज्यांतही स्थान मिळवू शकलेला नाही.

४. देशातील असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या सहभागात उत्तर प्रदेश (११.२८ टक्के) आणि पश्चिम बंगाल (१२.१८ टक्के) आघाडीवर असून महाराष्ट्राचा वाटा केवळ ९.५३ टक्के एवढाच आहे.