फिरोजपूर (पंजाब) येथील सीमेवर पाकिस्तानी तस्करांकडून २९ किलो हेरॉईन जप्त

तस्कर आणि सुरक्षादल यांच्यात चकमक : २ तस्कर अटकेत

अमृतसर (पंजाब) – फिरोजपूर जिल्ह्याच्या पाक सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलीस यांची पाकिस्तानी अमली पदार्थ तस्कर यांच्यात चकमक उडाली. या वेळी २ तस्करांना अटक करण्यात आली. एकाला गोळी लागल्याने तो घायाळ झाला आहे. त्यांच्याकडून २९ किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

पोलीस येथे अन्य तस्करांचा शोध घेत आहेत. ही घटना २० ऑगस्टला रात्री पावणेतीनच्या सुमारास घडली. काही तस्कर पाकिस्तानातून भारताच्या दिशेने येत असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना दिसले. सैनिकांनी तस्करांना सीमा न ओलांडण्याची चेतावणी दिली. नंतर त्यांनी तस्करांवर गोळीबार केला.