‘एन्.आय.ए.’च्‍या कारवाईत आतंकवाद्यांचा ‘इस्‍लामिक स्‍टेट’ स्‍थापन करण्‍याचा उद्देश उघड !

पुणे इसिस ‘मॉड्यूल’ प्रकरण !

पुणे – इसिस या आतंकवादी संघटनेने काही संवेदनशील ठिकाणी बाँबस्‍फोट घडवून देशातील जातीय सलोखा बिघडवण्‍याचा कट रचला होता. देशात ‘इस्‍लामिक स्‍टेट’ स्‍थापन करण्‍याच्‍या उद्देशाने दहशत आणि हिंसाचार पसरवण्‍यासाठी इसिसच्‍या ‘अजेंड्या’ला पुढे नेण्‍याची त्‍यांची योजना होती, असे ‘एन्.आय.ए.’कडून (राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून) सांगण्‍यात आले. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेल्‍या आरोपी शमिल साकिब नाचन याच्‍या ठाण्‍यातील घरी टाकलेल्‍या धाडीत ही गोष्‍ट समोर आली आहे.

‘एन्.आय.ए.’च्‍या अधिकार्‍यांनी इसिसच्‍या ‘स्‍लीपर सेल’चा सदस्‍य शमिलच्‍या ठाण्‍यातील पडघा येथील घरावर टाकलेल्‍या धाडीत अनेक भ्रमणभाष, ‘हार्ड डिस्‍क’ आणि काही हस्‍तलिखित कागदपत्रे मिळाली. त्‍याची पडताळणी आणि विश्‍लेषण केले जात आहे. शमिलला यापूर्वी बाँब सिद्ध करण्‍याचे प्रशिक्षण आणि चाचणी केल्‍याप्रकरणी अटक केली होती. शमिल हा ५ आरोपी तसेच अन्‍य संशयितांसह काम करत होता. त्‍यांनी बाँबस्‍फोट घडवून देशातील शांतता, जातीय सलोखा बिघडवण्‍याचा आणि आतंकवाद पसरवण्‍याचा कट रचला होता. शमिल हा ‘सिमी’ या प्रतिबंधित संघटनेचा पदाधिकारी होता.

आतापर्यंत अन्‍वेषणातून उघड झालेले वास्‍तव !

मुंबई आणि पुणे शहरात ३ जुलैला ४ जणांना अटक केली होती. त्‍यात एक जण मुंबईत, एकाला पुण्‍यात, तर इतर दोघांना ठाणे शहरात अटक केली होती. त्‍यानंतर पुणे शहरात १८ जुलैला एन्.आय.ए.च्‍या ‘मोस्‍ट वॉटेंड’ आतंकवाद्यांच्‍या सूचीत असलेले इम्रान खान आणि महंमद युनूस साकी पुणे पोलिसांच्‍या हातात लागले. या दोघांच्‍या इसिसशी असलेल्‍या संबंधामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली. या सर्वांना जोडणारा आरोपी शाहनवाज आलम हा बंदी घातलेल्‍या सिमी अन् इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटना पुन्‍हा सक्रीय करण्‍याचा प्रयत्न करत आहे.

एन.आय.ए. कडून जाहीर केलेले प्रसिद्धीपत्रक

अटक केलेले आरोपी उच्‍चशिक्षित आहे. या आरोपींनी ‘आयटी’, ‘सायबर’, विस्‍फोटक आणि बाँबस्‍फोटाचे प्रशिक्षण घेतले असल्‍याचे अन्‍वेषणातून उघड झाले आहे. या आरोपींचे ‘हँडलर’ विदेशात बसले आहे. त्‍यांना विदेशातून पैसा मिळत होता.