सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यदिनाची सुटी असूनही नळयोजनेतील बिघाड दुरुस्त करण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा पुढाकार

प्रशासनाची आदर्श कृती !

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते यांनी स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आटोपल्यावर पाण्याच्या पंपाच्या दुरुस्तीच्या कामात सहभाग घेतला. शासकीय सुटी असतांनाही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी कर्तव्यदक्षता दाखवत थेट पंप हाऊसवर जात बिघाड दुरुस्त करण्यात सहभाग घेतल्याविषयी सर्वच स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे. जिल्ह्यातील कासार्डे ग्रामपंचायतीच्या नळयोजनेत बिघाड झाल्यावर या नळयोजनेवर अवलंबून असणार्‍या वाडीवस्तीवर पाण्याची गैरसोय होणार असे लक्षात येताच कासार्डे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, उपसरपंच गणेश पाताडे यांनी थेट पियाळी नदी येथे असणार्‍या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणार्‍या पंप हाऊसवर जात बिघाडाची माहिती घेत दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना घेऊन ते थेट बिघाडस्थळी पोचले. या वेळी कर्मचारी काम करत असतांना ग्रामविकास अधिकारी कोलते यांनीही त्यांचा पांढरा पोषाख काढून ठेवत कर्मचार्‍यांना साहाय्य केले. उपसरपंच, कर्मचारी वर्ग यांनी त्यांना मोलाची साथ देत पाण्याच्या पंपाचा बिघाड दुपारपर्यंत दूर केला. स्वातंत्र्यदिनाची सुटी असतांनाही खंडित पाणीपुरवठा सुरळीत करून ग्रामस्थांचे मन जिंकत शासकीय कर्मचार्‍यांनी विश्वासार्हता कायम राखली.