‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराचा अपमान करणारे भालचंद्र नेमाडे खरे साहित्‍यिक आहेत का ?

‘ज्ञान शुद्ध, पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी असते. ज्ञानी माणसाची लक्षणे सुद्धा अशीच आहेत. ज्‍याचे आचार-विचार शुद्ध , पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी आहेत, तोच ‘ज्ञानी’ होय. याचाच अर्थ एखाद्या माणसाचे विचार शुद्ध, पवित्र, तेजस्‍वी आणि कल्‍याणकारी नसतील, तर त्‍याला ‘ज्ञानी’ म्‍हणता येणार नाही. असे असतांना ‘ज्ञानपीठ’ अपवित्र करण्‍याचा अधिकार कुणालाही नाही. ज्ञानामुळे माणसाची प्रज्ञा वृद्धींगत होते. वृद्धींगत झालेल्‍या ज्ञानाने माणसाची दृष्‍टी विशाल बनते. तिला विकृतीचा स्‍पर्श होत नाही. ती सत्‍याशी एकनिष्‍ठ असते. ज्ञान हे एवढे तेजस्‍वी आणि दाहक आहे की, ते सर्व दुष्‍कृत्‍यांचा नाश करते.

‘ज्ञानाग्‍निः सर्वकर्माणि भस्‍मसात्‍कुरुते तथा ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ४, श्‍लोक ३७), म्‍हणजे ‘ज्ञानरूप अग्‍नी सर्व कर्मांना भस्‍मसात करतो.’

भालचंद्र नेमाडे

१. ज्ञानपिठावर बसणारी व्‍यक्‍ती सन्‍मानास पात्र असणे महत्त्वाचे !

ज्ञानहीन माणूस जर ज्ञानपिठावर बसला, तर तो ज्ञानपिठाचीच राखरांगोळी करून टाकतो. ‘ज्ञानपीठ’ हे सर्वोच्‍च स्‍थान आहे. ते स्‍थान भ्रष्‍ट करण्‍याचा प्रयत्न जरी कुणी केला, तरी तो कोणत्‍याही सन्‍मानास पात्र ठरत नाही’, अशी आपली संस्‍कृती सांगते.

एखाद्याकडे स्‍वतःची प्रज्ञाच नसेल, तर त्‍याला कोण काय करणार ? सुभाषितकार म्‍हणतात,

यस्‍य नास्‍ति स्‍वयं प्रज्ञा शास्‍त्रं तस्‍य करोति किम् ।
लोचनाभ्‍यां विहीनस्‍य दर्पण: किं करिष्‍यति ॥

अर्थ : जसा दृष्‍टीहीन माणसाला आरशाचा काहीही उपयोग होत नाही. त्‍याचप्रमाणे बुद्धी नसलेल्‍या माणसाने शास्‍त्राचा कितीही अभ्‍यास केला, तरी काही उपयोग नाही.

नेमाडे यांना ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्‍मानित करण्‍यात आले. जगात सर्वांत श्रेष्‍ठ असलेले स्‍थान म्‍हणजे ज्ञानपीठ ! या ज्ञानपिठावर विराजमान झालेली व्‍यक्‍ती नम्र, सत्त्वशील असली पाहिजे. गीतेत भगवान श्रीकृष्‍ण अर्जुनाला सांगतात, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ४, श्‍लोक ३८), म्‍हणजे ‘या भूतलावर ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही.’

म्‍हणून ज्ञानपिठावर विराजमान झालेल्‍या व्‍यक्‍तीने सत्‍य, न्‍याय, नैतिकता यांचा मान राखून वक्‍तव्‍य करणे नितांत आवश्‍यक आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. भालचंद्र नेमाडे यांचे वक्‍तव्‍य लांच्‍छनास्‍पद आणि पुरस्‍काराचा अपमान करणारे !

औरंगजेबाचे गुणगान गाणार्‍या नेमाडे यांनी आपल्‍या वाणीने असत्‍य कथन करून ज्ञानपिठाचा अपमान केला आहे. औरंगजेब हा कुणी महात्‍मा नव्‍हता. त्‍याने केलेले अत्‍याचार इतिहासाच्‍या पानापानांवर आपल्‍याला आढळतात. पित्‍याला कारागृहात टाकणारा कोणताही पुत्र कितीही बलवान आणि बलाढ्य असला, तरी तो वंदनीय नसतो. राजसत्ता आपल्‍याला मिळावी; म्‍हणून औरंगजेबाने त्‍याचा मोठा भाऊ दाराशुकोहची हत्‍या केली होती. याच औरंगजेबाने काशीविश्‍वेश्‍वर मंदिराचे मशिदीत रूपांतर केले. आज ही मशीद ‘ज्ञानवापी मशीद’ म्‍हणून ओळखली जाते. आता याचे संशोधन चालू असून ज्ञानवापीत मंदिराचे अवशेष सापडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नेमाडे यांनी अत्‍यंत हीन पातळीवर जाऊन केलेले वक्‍तव्‍य लांच्‍छनास्‍पद आहे.

३. इतिहास विकृत करण्‍याचा प्रयत्न करणे, हा नेमाडे यांचा अक्षम्‍य अपराध !

नेमाडे यांनी पुढे ‘मुसलमान स्‍त्रिया काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन घेण्‍यासाठी मंदिरात गेल्‍या आणि तिथे असणार्‍या पुजार्‍यांमुळे त्‍यांचा थांगपत्ता पुढे लागला नाही’, अशा आशयाचे विधान केले की, जे असत्‍य आहे. ‘हिंदु पुजारी हे स्‍त्रीलंपट असून परधर्मातील स्‍त्रियांना ते पळवून नेत होते’, अशा अर्थाचे विधान करून त्‍यांनी हिंदु पुजार्‍यांवर आरोप केला आहे. ‘हिंदु पुजार्‍यांच्‍या या आगळीकीमुळे औरंगजेबाने ते हिंदु मंदिर स्‍वतःच्‍या कह्यात घेतले’, असा काल्‍पनिक इतिहास सांगून तो कलंकित आणि विकृत करण्‍याचा प्रयत्न ज्ञानपिठाधीश असलेल्‍या नेमाडे यांनी केला; म्‍हणून त्‍यांनी केलेला अपराध अक्षम्‍य आहे.

४. नेमाडे यांनी हिंदु धर्माविषयी केलेले वक्‍तव्‍य ज्ञानपीठ पुरस्‍काराला कलंकित करणारे !

हिंदु संस्‍कृती ही श्रेष्‍ठ असूनही नेमाडे यांना जीवनाची अडगळ वाटते. हिंदु संस्‍कृतीमधील महान तत्त्वे आणि आचारसंहिता आपल्‍या जीवनात आचरणात आणता येत नाहीत; म्‍हणूनच ते हिंदु संस्‍कृती अन् धर्म यांना अडगळ म्‍हणून दूर सारण्‍याचा प्रयत्न करतात; म्‍हणून त्‍यांचे हे कृत्‍य, वक्‍तव्‍य ज्ञानपीठ पुरस्‍काराला कलंकित करणारे आहे.

५. अपात्र व्‍यक्‍ती उच्‍च पदावर बसली; म्‍हणून ती आदरणीय होत नाही !

उच्‍च पदावर विराजमान झालेल्‍या कुणाही व्‍यक्‍तीने त्‍या पदाचा मान राखण्‍यासाठी स्‍वतःचे वर्तन अंतर्बाह्य शुद्ध आणि पवित्र ठेवण्‍यासाठी पराकाष्‍ठेचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न किंवा अशी काळजी त्‍या उच्‍च पदावर विराजमान झालेल्‍या व्‍यक्‍तीने घेतली नाही, तर ती व्‍यक्‍ती त्‍या पदावर बसण्‍यास पात्र आहे, असे म्‍हणता येत नाही.

फर्ग्‍युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रँग्‍लर परांजपे यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना वर्ष १९०५ मध्‍ये वसतीगृहातून काढले होते; कारण सावरकर यांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. वास्‍तविक सावरकर यांचे हे कृत्‍य राष्‍ट्राचा अभिमान बाळगणारे होते. त्‍यांच्‍या या कृत्‍यातून राष्‍ट्रभक्‍ती, राष्‍ट्रनिष्‍ठा व्‍यक्‍त होत होती. अशा वेळी प्राचार्य परांजपे यांनी सावरकर यांच्‍या पाठीशी ठामपणे उभे रहाणे अत्‍यंत आवश्‍यक होते. इंग्रज सरकारने सुद्धा या कृत्‍याविषयी सावरकर यांना दोषी ठरवले नव्‍हते. असे असतांनाही प्राचार्य परांजपे यांनी सावरकर यांना वसतीगृहातून काढले. याचा संताप लोकमान्‍य टिळक यांना आला. त्‍यांनी प्राचार्य परांजपे यांचा समाचार घेणारा ‘हे आमचे गुरु नव्‍हेत !’, असे शीर्षक असलेला अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात ‘प्राचार्यांनी राष्‍ट्रभक्‍त विद्यार्थ्‍याला दिलेली शिक्षा किती चुकीची आहे ?’, याचा ऊहापोह करून टिळक यांनी अखेरीस लिहिले…‘कावळा राजवाड्याच्‍या छतावर बसला; म्‍हणून तो गरुड होत नाही.’

याचा अर्थ ‘एखादी अपात्र व्‍यक्‍ती उच्‍च पदावर बसली; म्‍हणून आदरणीय ठरत नाही’, असा होतो. आज नेमाडे यांच्‍याविषयी नेमके हेच म्‍हणावेसे वाटते की, त्‍यांनी उच्‍च पदावर बसून हिंदुस्‍थानचा इतिहास कलंकित केला. एवढेच नव्‍हे, तर आपले राष्‍ट्र, आपली संस्‍कृती, आपला धर्म यांचा द्वेष करणार्‍या परकीय आक्रमकाला ‘नायक’ म्‍हणून घोषित केले. त्‍यांची ही कृती अभिमान वाटावी, अशी नाही. आज लोकमान्‍य टिळक असते, तर त्‍यांनी प्राचार्य परांजपे यांच्‍यासाठी जे उद़्‍गार काढले, तेच उद़्‍गार त्‍यांनी नेमाडे यांच्‍यासाठीही काढले असते.

६. नेमाडे यांना खर्‍या साहित्‍यिकत्‍वाचा विसर पडणे, ही खरी शोकांतिका !

नेमाडे यांचे वय वाढत चालले आहे. ते लेखक आणि वक्‍ते सुद्धा आहेत. आतापर्यंत केलेले वाचन, चिंतन, मनन, अभ्‍यास यांमुळे विशिष्‍ट प्रकारची उदात्त वृत्ती आणि विचार हृदयामध्‍ये स्‍फुरतात. ते विचार मानवी जीवनाचा विकास होण्‍यासाठी सांगायचे असतात. अशा पोषक आणि परिपक्‍व विचारांचा प्रचार अन् प्रसार करण्‍याचे दायित्‍व वक्‍त्‍यावर असते. वादविवादासाठी होणारी चर्चा ही परस्‍परांना पराभूत करण्‍यासाठी केलेली चर्चा असते, तर व्‍याख्‍यान हे केवळ जीवन विकासासाठी असते. या गोष्‍टीची आठवण एक वक्‍ता म्‍हणून नेमाडे यांना राहिली नाही, असे खेदाने म्‍हणावेसे वाटते.

‘ज्ञानाने जो परिपक्‍व झाला’, त्‍याला वृद्ध म्‍हणतात. अशा परिपक्‍व ज्ञानवंताच्‍या मनात कोणत्‍याही प्रकारच्‍या विकारांना थारा नसतो. ‘सत्‍याची साथ सोडून असत्‍याच्‍या मार्गाने वाटचाल करावी’, असा विचार त्‍याच्‍या स्‍वप्‍नातही येत नाही; कारण कर्तव्‍यनिष्‍ठ समाज निर्माण करण्‍याचे दायित्‍व साहित्‍यिकांवर असते, याची जाणीव त्‍याला असते. समाजाची ज्ञानलालसा वाढवण्‍यासाठी आणि स्‍वतःची ज्ञानालालसा अधिक वृद्धींगत करण्‍यासाठी जो झटतो, तो खरा साहित्‍यिक होय ! ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्‍त केलेल्‍या व्‍यक्‍तीला या गोष्‍टींचा विसर पडावा, हीच खरी शोकांतिका आहे. समाजजीवनात चैतन्‍य निर्माण करून समाजाची अस्‍मिता जागवण्‍याचे कार्य कळकळीने करणारी व्‍यक्‍तीच सरस्‍वतीचा खरा पुत्र, तोच खरा सारस्‍वत आणि तोच खरा साहित्‍यिक होय.

७. नेमाडे ज्ञानवृद्ध झाले आहेत कि नाहीत ? याचे त्‍यांनी आत्‍मपरीक्षण करावे

‘कोणतीही स्‍वार्थ बुद्धी मनात न ठेवता जो आपली ज्ञानसाधना अखंड चालू ठेवतो, त्‍याच्‍या जीवनातील क्षुद्रता दूर होते’, असा सिद्धांत आहे. या सिद्धांताचे ज्ञानपिठावर विराजमान झालेल्‍या नेमाडे यांना विस्‍मरण झाले; म्‍हणूनच त्‍यांनी केलेले वक्‍तव्‍य त्‍यांची कृती त्‍या ज्ञानपीठ पुरस्‍काराचा अपमान करणारी आहे. ज्‍याची बुद्धी, ज्‍याचे ज्ञान, ज्‍याचे प्रेम आणि ज्‍याची आशा विकसित झाली आहे, तो खरा ‘ज्ञानवृद्ध’ होय. या ज्ञानवृद्ध व्‍याख्‍येत स्‍वतःचा समावेश होतो कि नाही ? याचे आत्‍मपरीक्षण नेमाडे यांनी अवश्‍य करावे. यापेक्षा अधिक काय सांगावे !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (९.८.२०२३)

संपादकीय भूमिका

समाजाची आणि स्‍वतःची ज्ञानालालसा अधिक वृद्धींगत करण्‍यासाठी जो झटतो, तो खरा साहित्‍यिक !