|
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यात गेली अनेक वर्षे हत्तींची समस्या कायम आहे. या कालावधीत शेती, बागायती यांच्यासह जीवितहानीही झाली आहे. शासनाकडून दिली जाणारी हानीभरपाई तुटपुंजी आहे. त्यामुळे ‘आता आश्वासने नको, तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, अन्यथा आम्हाला अधिकार द्या !’, अशी मागणी करत दोडामार्ग तालुक्यातील हत्तीबाधित गावातील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी १० ऑगस्ट या दिवशी येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला अन् नंतर कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. अखेर ६ घंट्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, पाळये, सोनावल, हेवाळे, मुळस, बाबरवाडी या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन चालू झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी आंदोलकांची भेट घेऊन ‘याविषयी योग्य ती कृती करण्यात येईल’, असे आश्वासन दिले; मात्र लेखी आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निश्चय आंदोलकांनी घेतला होता.
शेवटी हत्तींना हटवण्याविषयी येत्या १५ दिवसांत मंत्रालयात वनमंत्र्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर शेतकर्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.