खुदीराम बोस यांच्‍यासारख्‍या क्रांतीकारकांची देशभक्‍ती आणि निर्भयता !

११ ऑगस्‍ट या दिवशी क्रांतीकारक खुदीराम बोस यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांना विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक खुदीराम बोस यांना इंग्रज न्‍यायाधीश म्‍हणतात, ‘‘तू बाँब बनवून इंग्रज अधिकार्‍यांना मारले आहेस; म्‍हणून आज तुला मृत्‍यूदंड ठोठावण्‍यात येत आहे.’’ निर्णय ऐकतांनाही खुदीराम यांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य होते. न्‍यायाधिशांना वाटले, ‘कदाचित् याने बरोबर ऐकले नसेल.’ तो म्‍हणाला, ‘‘खुदीराम बोस, ऐकलेस का ? तुला फासावर चढवण्‍यात येईल.’’

भारतमातेचा तो सुपुत्र (खुदीराम बोस) खळखळून हसला आणि म्‍हणाला, ‘‘ही तर कपडे पालटण्‍यासारखीच शिक्षा दिली ! असे तर कित्‍येक शरीर मला मिळाले आणि ते मी सोडून दिले.’’

न्‍यायाधीश त्‍यांच्‍याकडे पहातच राहिले, मग म्‍हणाले, ‘‘तुला काही सांगायचे आहे का ?’’ खुदीराम बोस हसत म्‍हणाले, ‘‘हो, जर तुम्‍ही मला अनुमती दिली, तर मी येथे जाहीररीत्‍या सांगू शकतो की, तो बाँब कसा बनवला होता ?’’

बलीदान देणार्‍यांमध्‍ये कशी निर्भयता होती, कसा विवेक होता ! ब्रिटीश शासनाने सूचना पाठवली, ‘यांचे (देशभक्‍तांचे) दमन आणखी वेगाने करा. हिंदुस्‍थानींना तुडवणे आणखी वाढवा, जेणेकरून हे स्‍वातंत्र्याची गोष्‍टच विसरून जातील. यांना फाशीमागून फाशी देत रहा.’

(साभार : मासिक ‘ॠषी प्रसाद’, जुलै २०१७)