अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

संपादकीय

पाकिस्‍तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांनी पाकिस्‍तानची संसद केली विसर्जित !

गेल्‍या काही दिवसांपासून पाकिस्‍तानमध्‍ये चालू असलेल्‍या राजकीय नाट्याची समाप्‍ती झाली असून ९ ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्री पाकिस्‍तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांनी पाकिस्‍तानची संसद विसर्जित केली. ३४२ सदस्‍य असलेल्‍या पाकिस्‍तानच्‍या संसदेने नेहमीच राजकीय अस्‍थिरता पाहिली आहे. येणार्‍या ९० दिवसांत तेथे निवडणुका होणे अपेक्षित आहे; मात्र सद्यःस्‍थितीत इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्‍यावर शहबाज यांच्‍या कार्यकाळात गेल्‍या ४ मासांपासून पाकिस्‍तानची आर्थिक स्‍थिती पुष्‍कळच डबघाईला आली आहे. पाकिस्‍तानच्‍या राजकारणात नेहमीच लष्‍कर वरचढ ठरलेले आहे. यापूर्वी अनेक वेळा पाकिस्‍तानी लष्‍कराने विविध कारणे देत त्‍या काळातील सरकारे विसर्जित केली आहेत. कोणता पक्ष निवडून येणार, हे बहुतांशरित्‍या पाकमधील लष्‍करच ठरवत असते. त्‍यामुळे कोणतेही सरकार आले, तरी ते लष्‍कराच्‍या ताटाखालचे मांजरच असणार हे निश्‍चित !

भारताशी नेहमीच शत्रुत्‍व !

भारत आणि पाकिस्‍तान हे दोन्‍ही देश वेगळे झाल्‍यापासून पाकिस्‍तानने नेहमीच भारताशी शत्रुत्‍वाच्‍या भूमिकेतूनच व्‍यवहार केला. भारतात सतत अशांतता माजवून निरपराध नागरिकांचे बळी घेण्‍याचे काम पाकिस्‍तानकडून होत असते. वर्ष २०१४ पूर्वी भारत देशाने नेहमीच पाकशी संवाद आणि सामोपचार यांची भाषा केली. याउलट पाकिस्‍तानचे राज्‍यकर्ते आणि लष्‍कर नेहमीच भारतावर कुरघोडी कशी करता येईल ? यासाठीच प्रयत्नशील असायचे. भारताशी नेहमीच शत्रुत्‍व बाळगण्‍याच्‍या प्रयत्नात पाकिस्‍तान सध्‍या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे, तर भारत जगातील पहिल्‍या ५ क्रमांकाच्‍या अर्थव्‍यवस्‍था असलेल्‍या देशांमध्‍ये आहे.

रशियाशी धोका !

यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धात पाकिस्‍तानने ‘आम्‍ही रशियासमवेत आहोत’, असे सांगितले होते. याचसमवेत नुकतेच युक्रेनचे परराष्‍ट्रमंत्री जेव्‍हा पाकिस्‍तानच्‍या दौर्‍यावर होते, तेव्‍हा ‘पाकिस्‍तान सरकार युक्रेनला कोणतीही शस्‍त्रे पुरवत नाही’, असे सांगितले होते. दुसरीकडे मात्र पाकिस्‍तानने युक्रेनला दारूगोळा पुरवण्‍याची मोठी योजना आखली असून १५० कंटेनर पोलंडमार्गे युक्रेनला पाठवण्‍यात येणार आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या पाकिस्‍तानला ‘यातून निधी मिळेल’, अशी आशा आहे; मात्र त्‍याच वेळी रशियाच्‍या विरुद्ध भूमिका घेतली असेच म्‍हणावे लागेल. कधी रशियाला धोका, तर कधी अमेरिकेला धोका, तर कधी कधी चीनवरही डोळे वटारण्‍यापर्यंत पाकिस्‍तानची मजल गेली होती. त्‍यामुळे जागतिक स्‍तरावरही पाकिस्‍तानची विश्‍वासार्हता संपुष्‍टात आली आहे.

पाकिस्तानी सैन्य आणि इम्रान खान यांच्यातील वितुष्ट

इम्रान खान यांची कोंडी करण्‍याचा प्रयत्न !

जे इम्रान खान एकेकाळी पाक लष्‍करचे लाडके होते, त्‍याच इम्रान खान यांनी पाक लष्‍कराच्‍या विरोधात भूमिका घेतल्‍यावर त्‍यांना अविश्‍वास प्रस्‍तावाला सामोरे जाऊन पद सोडावे लागले. इम्रान यांनी पाकिस्‍तानी लष्‍कराच्‍या विरोधात भूमिका घेतल्‍याने ते लष्‍कराचे इतके नावडते झाले की, त्‍यांच्‍यावर गेल्‍या काही मासांत अनेक प्रकरणांत गुन्‍हे नोंद झाले आणि अटक झाली. आता तर त्‍याही पुढे जाऊन इम्रान खान यांना ‘तोशाखाना’ प्रकरणात ३ वर्षांच्‍या कारागृहाची शिक्षा सुनावल्‍यावर लगेचच त्‍यांना न्‍यायालयाने ५ वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. त्‍यामुळे इम्रान यांनी पुढील निवडणूक लढवू नये, अशी पुरेपुर व्‍यवस्‍था लष्‍कराने करून ठेवली आहे.

पाकिस्तानात सततची यादवी युद्धासारखी परिस्थिती

सातत्‍याने कर्जबाजारी आणि ढासळती अर्थव्‍यवस्‍था !

कट्टर धार्मिकता आणि द्वेषावर आधारित राजकारण केल्‍यामुळे पाकिस्‍तानचा विकास कधी झालाच नाही. गेली अनेक वर्षे चीन आणि अमेरिका पाकिस्‍तानला नियमित कर्ज देतात; मात्र पाकिस्‍तानने हा पैसा विकासासाठी व्‍यय न करता आतंकवादी कारवायांसाठीच वापरला. पाकिस्‍तानमध्‍ये सध्‍या अन्‍नधान्‍यापासून प्रत्‍येक वस्‍तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत. गहू, तांदूळ, दूध, भाजी, इंधन यांच्‍या किमती गगनाला भिडल्‍या असून अनेक लोकांना एक वेळचे भोजनही मिळणे शक्‍य होत नाही. सद्यःस्‍थितीत कांदा २२० रुपये किलो, लिंबू १६० रुपये किलो, टोमॅटो ५०० रुपये किलो, पेट्रोल २७३ रुपये लिटर, तर दूध २१० रुपये लिटर, असे दर असून महागाईने सामान्‍यांचे कंबरडे कधीच मोडले आहे.

कर्जबाजारी आणि ढासळती अर्थव्‍यवस्‍था

पाकिस्‍तानच्‍या रुपयाचे मूल्‍य इतके खाली गेले आहे की १ डॉलरसाठी २७० पाकिस्‍तानी रुपये मोजावे लागतात. सध्‍या देश चालवण्‍यासाठी पाकिस्‍तानकडे केवळ १ मास पुरेल एवढीच रक्‍कम शिल्लक आहे. अर्थात् पाकिस्‍तानचा मित्र चीन नेहमीप्रमाणे त्‍याच्‍या साहाय्‍यास धावला असून नुकतेच चीनने पाकिस्‍तानला २ वर्षांसाठी २.४ अब्‍ज डॉलर ( ६४८ कोटी रुपये) कर्ज दिले आहे. त्‍यामुळे चीन जे जे सांगेल ते पाकिस्‍तान करेल आणि अर्थात् भारताला त्रास देण्‍यासाठी जे जे करता येईल, ते सर्व चीन यापुढील काळात पाकिस्‍तानकडून करवून घेईल.

भारताला अधिक सतर्क रहाण्‍याची आवश्‍यकता !

पाकिस्‍तानची स्‍थिती अशी आहे की, तिथे कधीही लष्‍कर देश कह्यात घेऊ शकते. जेव्‍हा जेव्‍हा लष्‍करशाही पाकिस्‍तानमध्‍ये आली, तेव्‍हा तेव्‍हा भारताला अधिक धोका निर्माण झाला. मुशर्रफ यांच्‍याच कार्यकाळात कारगिल युद्ध घडले. याचसमवेत पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

पाकमधील गोंधळाचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करण्‍यात पुढाकार घ्‍यावा !