प्रखर हिंदुत्वनिष्ठ रश्मी सामंत यांचे पुस्तक ‘अ हिंदु इन ऑक्सफर्ड’चे प्रकाशन !

ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या हिंदु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षावर अत्याचार झाल्याच्या घटनाक्रमाचा उल्लेख !

धर्मनिरपेक्षतावादी, काँग्रेसी, धर्मांध मुसलमान यांचा विरोध !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ रश्मी सामंत

उडुपी (कर्नाटक) – ऑक्सफर्ड विद्यापिठात शिक्षण घेतलेल्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ रश्मी सामंत यांनी विद्यापिठात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे कथन करणारे पुस्तक ‘अ हिंदु इन ऑक्सफर्ड’ प्रकाशित केले आहे. त्यांनी या विषयीची माहिती ट्विटरद्वारे प्रसारित केली असता साम्यवादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, काँग्रेसी, धर्मांध मुसलमान आदींकडून विरोध केला जात आहे.

सामंत यांनी पोस्ट करतांना म्हटले की, ऑक्सफर्ड येथील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून मी पहिली भारतीय महिला होते. हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजे माझ्यासाठी ‘गुंडगिरी, छळ आणि धमक्या यांचे त्रासदायक दु:स्वप्न’च होते. ऑक्सफर्ड हिंदु अध्यक्ष स्वीकारण्यास सिद्ध नसल्याने मला पायउतार व्हावे लागले.

त्या पुढे म्हणाल्या की, कालांतराने मला लक्षात आले की, ऐतिहासिकदृष्ट्या हिंदूंना वेठीस धरण्याच्या जागतिक षड्यंत्राला मी बळी पडले असून आतापर्यंत याचे असंख्य बळी गेले आहेत.

यावर काँग्रेसच्या कर्नाटकातील नेत्या ऐश्‍वर्या महादेश बरळल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही बळी ठरल्याचे तुमचे खोटे कथानक तुम्हाला कुठेच नेणार नाही. ऑक्सफर्डला तुमची कधीच आवश्यकता नव्हती !

संपादकीय भूमिका

हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या प्रत्येक प्रयत्नाला हिंदुद्वेष्टी जमात विरोध करणार, यात काय आश्‍चर्य ? अर्थात् हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कार्य करणार्‍या रश्मी सामंत यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी मात्र हिंदूंनी ठामपणे उभे रहाणे आवश्यक !