महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांविषयी दाखवला जाणारा दुटप्‍पीपणा !

‘मणीपूरमधील चित्रफितीमुळे सर्व देशवासियांची मान लज्‍जेनेे खाली गेली. महिलांच्‍या विरोधात अत्‍यंत घृणास्‍पद कृत्‍ये घडत आहेत. त्‍यामुळे अशा कृत्‍यांच्‍या संदर्भात दुटप्‍पीपणा टाळून त्‍यावर गांभीर्याने चर्चा करण्‍याची आवश्‍यकता आहे. मणीपूरमधील महिलांविरुद्धच्‍या अत्‍यंत घृणास्‍पद कृत्‍यामुळे सर्व देशाला धक्‍का बसला. तेव्‍हापासून तेथे जे काही घडत आहे, ते अधिक चिंता करण्‍याजोगे आहे. ज्‍या वेळी मणीपूरमधील घटनेमुळे देशभरात वादळ निर्माण झाले, त्‍याच वेळी बंगालमध्‍ये मणीपूरमधील घटनेसमान हृदयद्रावक चित्रफीत प्रसारित झाली. त्‍यानंतर उडुपी येथे एका शैक्षणिक संस्‍थेमधील घटनेमध्‍येही काही मुलींनी इतर मुलींचे स्नानगृहातील चित्रीकरण करून त्‍याची चित्रफीत पुरूषांना पाठवली. हे सर्व अत्‍यंत तिरस्‍करणीय आहे. एकीकडे प्रतिदिन अशा घटना समोर येत असतांना दुसरीकडे प्रसारमाध्‍यमे मात्र गुन्‍हा घडलेल्‍या राज्‍यात कोणत्‍या पक्षाचे सरकार आहे ? गुन्‍हा करणारा किंवा गुन्‍ह्यात फसलेल्‍याची जात, लिंग कोणते ? आदींविषयीच चर्चा करत आहेत. महिलांचे कपडे उतरवण्‍यासारखे अमानवी कृत्‍य होणे आणि त्‍याचा राजकारण म्‍हणून वापर करून त्‍या दृष्‍टीने या गुन्‍ह्यांकडे पहाणे, ही सभ्‍य समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे.

लेखक : प्रफुल्‍ल केतकर, संपादक, साप्‍ताहिक ‘ऑर्गनायझर’

१. संसदेत विरोधी पक्षांच्‍या भूमिकेमुळे समानतेवर आधारित न्‍याय आणि संरक्षण यांवर परिणाम !

संसदेच्‍या पावसाळी अधिवेशनाचे सत्र चालू होण्‍याच्‍या आदल्‍या दिवशी मणीपूरमधील घटनेची चित्रफीत प्रसारित झाली. त्‍यामुळे ‘आरोप-प्रत्‍योरापांचा पूर येऊन पावसाळी अधिवेशन धुवून निघेल’, हे स्‍पष्‍ट झाले. ‘संसदेत चर्चेपासून पळून जाण्‍यासाठी ही चित्रफीत प्रसारित करण्‍यात आली’, असा आरोप केला जात आहे. हा गुन्‍हा कितीतरी पटींनी मोठा आहे. संसदेचे सत्र चालू होण्‍यापूर्वी पंतप्रधानांनी या घटनेविषयी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली, तर गृहमंत्री याविषयी संसदेत चर्चा करण्‍यास प्रारंभ करणार होते; परंतु मणीपूरमधील घटनेविषयी राष्‍ट्राला संपूर्ण माहिती कळू देण्‍याऐवजी विरोधी पक्ष प्रतिदिन वेगवेगळी कारणे सांगून यापासून पळ काढण्‍याचा प्रयत्न करत असल्‍याचे चित्र दिसले; कारण ‘या चर्चेतून इतिहासातील काँग्रेसची कृत्‍ये स्‍पष्‍टपणे उघड होतील’, अशी भीती त्‍यांना असावी. संसदेच्‍या कामकाजाच्‍या नावाखाली विरोधी पक्ष स्‍वतःची बाजू लपवण्‍याचा प्रयत्न करत आहे.

यामुळे विरोधी पक्ष ईशान्‍य भारतातील राज्‍यांमधील राष्‍ट्रीय सुरक्षा, अमली पदार्थ, जातीय दावे, भूमी हक्‍क, सीमारेषा आणि सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे शांतता, यांविषयी सविस्‍तर चर्चा करणे टाळत आहेत. प्रत्‍येक प्रश्‍नावरील दांभिक भूमिकेचा लोकशाहीच्‍या दृष्‍टीने होणारी चर्चा किंवा संवाद यांवर थेट परिणाम होत आहे. या प्रक्रियेमुळे होणारी सर्वांत मोठी हानी म्‍हणजे देशाच्‍या इतर भागांत महिलांच्‍या संदर्भातील गुन्‍ह्यांकडे होणारे दुर्लक्ष, हे आहे. बंगालमधील महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांमध्‍ये न्‍यायालयाने हस्‍तक्षेप केल्‍यानंतर पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला. अशा वेळी विरोधी पक्षांचे ऐक्‍य राखून ठेवण्‍यासाठी मौन धारण करणारे काँग्रेस आणि साम्‍यवादी पक्ष यांना ‘धन्‍यवादच’ द्यावे लागतील. गुन्‍हेगारांना त्‍यांच्‍या धार्मिक ओळखीवरून निर्दोष ठरवणारे आणि महिलांवरील अत्‍याचारांविषयी आवाज उठवणार्‍यांविरुद्ध इतरांना चिथवणारे हे स्‍वयंघोषित पक्ष आहेत. या प्रक्रियेमुळे समानतेवर आधारित न्‍याय आणि कायद्याचे संरक्षण यांवर परिणाम होत आहे.

२. लव्‍ह जिहाद आणि दलित महिलांवर अत्‍याचार यांविषयी न बोलणारे काँग्रेसी !

उत्तरप्रदेशमध्‍ये अमानवी गुन्‍हेगारांकडे एक महिला स्‍वतःच्‍या कपड्यांची भीक मागत असल्‍याची एक चित्रफीत प्रसारित केली गेली नाही; कारण ‘काहींना’ या गुन्‍हेगारांची धार्मिक ओळख अनुकूल ठरत नव्‍हती. राजस्‍थानमध्‍ये महिलांच्‍या विरोधातील अत्‍याचारांविषयी विधान करणार्‍या मंत्र्याला मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातून काढून टाकले.  राष्‍ट्रीय स्‍तरावर मुसलमान युवक खोटी ओळख सांगून हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍यासाठी लव्‍ह जिहाद करत आहेत. त्‍याविरुद्ध बोलणे, म्‍हणजे ‘आंतरधर्मीय विवाहाच्‍या विरोधात द्वेष पसरवणे’, असे म्‍हटले जाते.

३. तथाकथित सर्व धर्म समभाववाद्यांमुळे हिंदू संकटात !

दुसरीकडे मुसलमान तरुणींना हिजाब (मुसलमान महिला डोके आणि मान झाकण्‍यासाठी वापरत असलेले वस्‍त्र) घालण्‍यासाठी बळजोरी केली जाते. जर त्‍यांनी दुसरा धर्म किंवा जात असलेल्‍या मुलासह रहाण्‍याचे ठरवले, तर मूलतत्त्ववादी मुसलमान त्‍या मुलावर आक्रमण करतात. याकडे ‘स्‍वातंत्र्यतावादी’ असे स्‍वयंघोषित प्रमाणपत्र घेतलेली प्रसारमाध्‍यमे, बुद्धीवादी आणि पुरोगामी कानाडोळा करतात. उदारमतवाद आणि सर्वधर्मसमभाव यांच्‍या नावाखाली आपण महिलांच्‍या समस्‍या, त्‍यांच्‍या भावना अन् काळजी यांना क्षुल्‍लक समजत आहोत. खोटे स्‍वातंत्र्यतावादी आणि सर्वधर्मसमभाव मानणारे स्‍वतःच्‍याच विचारांमुळे उघडे पडत आहेत. तथापि यामुळे हिंदु समाजाला मात्र मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

४. क्षुल्‍लक राजकारणासाठी आपल्‍या माता-भगिनींची फसवणूक होऊ देणार का ?

अशा प्रकारचा ढोंगीपणा आणि दुटप्‍पीपणा हा भारत अन् आपली प्राचीन संस्‍कृती यांच्‍यासमोरील सर्वांत मोठे आव्‍हान आहे. स्‍वामी विवेकानंद यांनी त्‍यांच्‍या ‘द मास्‍टर एज आय सॉ’ या पुस्‍तकात लिहिले आहे, ‘‘महिलांची पूजा करण्‍यामागे श्रीरामकृष्‍ण परमहंस यांचा ‘प्रत्‍येक महिला ही आशीर्वाद देणारी माता आहे’, असा भाव होता.’’ ते पुढे म्‍हणतात, ‘‘महिलांमधील देवत्‍वाला आपण फसवू शकत नाही. तसे कधीच झाले नाही आणि होणार नाही. हे देवत्‍व त्‍याच्‍या जागी ठाम आहे. ते अविचल असून अचूकपणे ढोंगीपणा दाखवून देते. त्‍याला सत्‍य, आध्‍यात्‍मिक प्रकाश, शुद्धता आणि पावित्र्य जाणवते. खरोखरच आध्‍यात्‍मिकता प्रस्‍थापित करण्‍यासाठी अशा प्रकारचे पावित्र्य आवश्‍यक आहे.’’ समाज म्‍हणून आपण क्षुल्‍लक राजकारणासाठी आपल्‍या माता-भगिनींची फसवणूक होऊ देणार का ? ‘जर’ आणि ‘तर’चा विचार न करता आपण महिलांविरुद्ध होणार्‍या गुन्‍ह्यांविषयी उघडपणे चर्चा केली पाहिजे, तसेच समाजात महिलांच्‍या दर्जाविषयी आपल्‍या मूळ संकल्‍पना जाणून घेऊन ‘त्‍यांची घसरण का झाली ?’ याची कारणे शोधून त्‍यात दुरुस्‍ती केली पाहिजे.

५. महिलांवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी धर्माचरणावर आधारित रामराज्‍याची चळवळ उभारणे आवश्‍यक !

एकीकडे राममंदिराची उभारणी होत असतांना दुसरीकडे आपण वैयक्‍तिकरित्‍या आणि एकत्र येऊन रामराज्‍य निर्माण केले पाहिजे. आता अयोध्‍येतील भव्‍य मंदिराच्‍या उभारणीला आकार येत असतांना आपला समाज मात्र दुटप्‍पीपणाच्‍या धोक्‍याला सामोरा जात आहे. जशी आपण अयोध्‍येत राममंदिर उभारण्‍यासाठी चळवळ उभारली, तशी धर्माचरणावर आधारित रामराज्‍य प्रस्‍थापित करण्‍यासाठी चळवळ उभारली पाहिजे. त्‍यानंतर स्‍थापन होणार्‍या रामराज्‍यामध्‍ये महिलांच्‍या विरोधात गुन्‍हे घडणार नाहीत आणि जर घडलेच, तर आपण त्‍याचे राजकारण न करता राष्‍ट्रीय निष्‍ठेपोटी त्‍यास विरोध करू.’

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये अन्‍य नियतकालिकांमधील लेख प्रसिद्ध केले जातात. ‘समाजाचे उद़्‍बोधन करणारी, तसेच राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या संदर्भात नाविन्‍यपूर्ण माहिती वाचकांना मिळावी, तसेच समाजात चांगल्‍या माहितीचा प्रसार व्‍हावा’, या उद्देशांनी हे समाजोपयोगी लिखाण प्रसिद्ध केले जाते’, याची वाचकांनी नोंद घ्‍यावी. – संपादक