पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ भोर येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने सन्‍मान मोर्चा !

भोर येथे पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सन्‍मान मोर्चा

भोर (जिल्‍हा पुणे), ७ ऑगस्‍ट (वार्ता.) – मूठभर लोकच गुरुजींच्‍या विरोधात असून सकल हिंदु समाज पू. भिडेगुरुजी यांच्‍या पाठीशी आहे, हे सांगण्‍यासाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शिवतीर्थ, चौपाटी, भोर येथे पू. भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सन्‍मान मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. यापुढील काळात पूजनीय गुरुजींच्‍या विरोधात विनाकारण चुकीचे आरोप केल्‍यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी या वेळी देण्‍यात आली.

या प्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, सकल मराठा समाज, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, सनातन संस्‍था, हिंदु जनजागृती समिती, आम्‍ही भोरकर प्रतिष्‍ठान, भोर; प्रतापगड उत्‍सव समिती, शिलेदार प्रतिष्‍ठान भोर यांच्‍यासह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवशंभू भक्‍त धारकरी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. मोर्चाचा आरंभ शिवतीर्थ भोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला पुष्‍पहार घालून आणि श्‍लोक घेऊन करण्‍यात आला. पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या प्रतिमेला शिवतीर्थावर दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला आणि ध्‍येयमंत्र घेऊन मोर्चाची सांगता करण्‍यात आली.

पू. भिडेगुरुजी यांचे राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी त्‍यागाचे मोठे योगदान आहे ! – धनंजय पवार, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे भोर तालुका प्रमुख

पू. भिडेगुरुजी यांचे राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी त्‍यागाचे मोठे योगदान आहे. त्‍यांच्‍या पाठीशी सकल हिंदु समाज आहे. विरोधकांनी पू. भिडेगुरुजी यांच्‍या संदर्भात जर अयोग्‍य शब्‍दांचा वापर केला, तर ‘जशास तसे’ प्रत्त्युत्तर देण्‍यात येईल.

पू. भिडेगुरुंजीवर विनाकारण आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करू नये ! – सुनील खळदकर, धारकरी

या प्रसंगी धारकरी श्री. सुनील खळदकर म्‍हणाले की, पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी गांधीजींची अपकीर्ती केली, असा आरोप काँग्रेस करत आहे; मात्र वस्‍तूतः ही माहिती काँग्रेसचे एक सदस्‍य यांनी लिहिलेल्‍या पुस्‍तकाच्‍या आधारे दिली आहे. हे पुस्‍तक वर्ष १९८३ मध्‍ये प्रकाशित झाले आहे. त्‍यामुळे विनाकारण पू. गुरुजींवर आरोप करून त्‍यांची अपकीर्ती करू नये.