धारूर तालुक्यातील जोड हिंगणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत खिचडी शिजवण्याचे काम करणारी महिला आणि शिक्षिका यांच्यामध्ये वाद झाला. खिचडी बनवणारी महिला विद्यार्थ्यांसाठी पुरेशी खिचडी बनवत नाही, तसेच खिचडी बनवण्याचा दर्जाही अत्यंत न्यून असल्याने शिक्षिकेने तिला विद्यार्थ्यांना पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी केली. या कारणावरून संबंधित महिलेने पतीसह शाळेत उपस्थित राहून शिक्षिकेसमवेत वाद घालत तिला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही सामाजिक प्रसारमाध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. घडलेला प्रकार शिक्षण व्यवस्थेसाठी निंदनीय तर आहेच; पण भारतीय संस्कृती, नीतीमूल्ये यांनाही काळीमा फासणारा आहे. शाळेच्याच परिसरात एकमेकींचे केस पकडून पशूंप्रमाणे एकमेकींवर तुटून पडलेल्या या महिलांना पाहून अनेक जण हसलेही असतील; परंतु ‘हेच का महिला सक्षमीकरण ?, ‘हेच का बाईपण भारी ?’ असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याविना रहात नाहीत. शाळेत ज्ञानार्जन करण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहून कोणता आदर्श घ्यावा ?, हाही मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होऊन दोषी महिलेवर कारवाई होणे आवश्यक आहे.
यापूर्वीही सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या मारामारीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सामाजिक भान विसरून अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या होणार्या मारामारीचे प्रकार महिला सक्षमीकरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. केवळ स्वैराचाराने ‘बाईपण भारी’ होत नाही, तर संयम आणि सामाजिक भान असणेही तितकेच आवश्यक आहे.
आतापर्यंत शालेय पोषण आहारात पाल, अळ्या सापडणे, हलक्या प्रतीचा पोषण आहार सिद्ध करणे, असे प्रकार समोर येत होते. आता मात्र या घटनेवरून पोषण आहार सिद्ध करणार्या ठेकेदारांचा उद्दामपणा किती वाढला आहे, हे लक्षात येते. त्यामुळे पोषण आहार सिद्ध करणारे ठेकेदार प्रतिवर्षी पालटणे आवश्यक आहे. अनेक वेळा पोषण आहारासाठी आलेले तांदूळ, डाळ हे ठेकेदार घरी घेऊन जातात आणि अल्प प्रतीचा तांदूळ पोषण आहारासाठी वापरतात. हे सर्व अपप्रकार थांबवण्यासाठी आणि पोषण आहाराविषयीच्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने वेळीच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे.
– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर