गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

पणजी, १६ जुलै (वार्ता.) – गोवा हस्तकला मंडळाने यंदाही शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना पूर्वीप्रमाणेच प्रत्येक मूर्तीमागे १०० रुपये अनुदान घोषित केले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये निराशा पसरली आहे.

श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी आवश्यक माती, रंग आदींचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी गतवर्षी मूर्तीकारांनी लावून धरली होती. त्या वेळी महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पुढील वर्षी प्रत्येक मूर्तीमागे २०० रुपये अनुदान करणार असल्याची हमी दिली होती; मात्र यंदाही अनुदान १०० रुपयेच ठेवल्याने मूर्तीकारांमध्ये अप्रसन्नता आहे. याविषयी हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर म्हणाले, ‘‘यंदाही महामंडळाने मूर्तीकारांना श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी २० यंत्रे घेऊन दिली आहेत. मूर्तीकारांना प्रत्येक मूर्तीमागे ३०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मी सरकारसमोर ठेवला होता; मात्र काही कारणांमुळे त्याला मान्यता मिळाली नाही. पुढील वर्षी निश्चितच ३०० रुपये अनुदान देण्यात येईल.’’

महामंडळाच्या अधिकार्‍यांनी मूर्तीकारांच्या घरी भेट देऊन तपासणी करावी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवरील बंदीची कार्यवाही यशस्वीपणे व्हावी, या आणि इतर कारणांसाठी महामंडळ शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना अनुदान देते. सध्या अनेक जण गोव्याबाहेरून श्री गणेशमूर्ती आणून तिची विक्री करत आहेत. महामंडळाच्या अधिकार्‍यांनी मूर्तीकारांच्या घरी भेटी देऊन तपासणी करावी, अशी मागणी गणेशमूर्तीकार श्रद्धा गवंडी यांनी केली आहे.

Download

संपादकीय भूमिका

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?