गुरुकृपा आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांमुळे एका दुर्मिळ आजारातून बरे झाल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती

१. एका आजारावरलस घेतल्‍यावर नाक आणि घसा येथे त्रास होऊन साधिकेचे बोलणे अस्‍पष्‍ट होणे 

‘नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये मी एका आजारावर लस घेतली होती. दुसर्‍या दिवशी अकस्‍मात् माझे बोलणे अस्‍पष्‍ट आणि तोतरे होऊन मला नीट बोलता येईनासे झाले. मला नाक आणि घसा येथे त्रास होऊ लागला. बोलतांना माझ्‍या नाकातून आवाजही येऊ लागला. माझे अस्‍पष्‍ट बोलण्‍याचे प्रमाण पुष्‍कळ वाढले. यामुळे माझ्‍या मनावर पुष्‍कळ ताण येऊन मनात नकारात्‍मक विचार येऊ लागले.

२. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍याशी बोलल्‍यावर ५० टक्‍के त्रास न्‍यून होणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्‍यावर बरे वाटणे

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ    सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर

मी मला होणार्‍या शारीरिक त्रासांविषयी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍याशी बोलले. त्‍या मला अतिशय प्रेमाने म्‍हणाल्‍या, ‘‘अगं, तू काही घाबरू नकोस. या सर्वांतून तू लवकरच बरी होणार आहेस !’’ त्‍यांच्‍याशी बोलल्‍यावर माझे ५० टक्‍के त्रास न्‍यून झाले. माझी सर्व भीती गेली आणि मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. त्‍यानंतर त्‍यांनी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून मला नामजपादी उपाय सांगितले आणि म्‍हणाल्‍या, ‘‘आता केवळ गुरुदेवांना प्रार्थना आणि त्‍यांचे स्‍मरण कर अन् दिलेला नामजप पूर्ण कर. गुरुदेवच तुला बरे करतील !’’ सद़्‍गुरु ताईंशी बोलून भ्रमणभाष ठेवल्‍यावर मला थोड्या वेळातच हलके वाटून बरे वाटले. त्‍यानंतर मी नामजपादी उपाय केले. त्‍यामुळेही माझा पुष्‍कळ त्रास न्‍यून होऊन मला बरे वाटू लागले.

३. आजाराचे नेमके निदान होण्‍यासाठी आधुनिक वैद्यांनी एक चाचणी करण्‍यास सांगणे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना अन् नियमित नामजपादी उपाय करणे

सौ. कपिला महेश घाणेकर

मला होणार्‍या त्रासाविषयी आधुनिक वैद्यांना सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘हा एक दुर्मिळ आजार असून तो काही लोकांनाच होतो.’’ या आजाराचे नेमके निदान होण्‍यासाठी त्‍यांनी एक चाचणी करायला सांगितली. या चाचणीचे अहवाल येण्‍यास ७ दिवस लागणार होते. मला या आजाराच्‍या संदर्भात काहीच ठाऊक नव्‍हते. या परिस्‍थितीत माझ्‍याकडून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना होत होत्‍या, ‘देवा, तुम्‍हाला अशक्‍य असे काहीच नाही. माझा सर्व भार तुमच्‍यावरच आहे. यातून तुम्‍हीच मला वाचवणार आहात. मला सर्व स्‍वीकारता येऊ दे.’ मला सांगितलेले नामजपादी आध्‍यात्मिक उपाय मी नियमित करत होते.

४. आजाराचे निदान ‘पॉझिटिव्‍ह’ आल्‍यावर आधुनिक वैद्यांनी साधिकेला दुर्मिळ आणि गंभीर आजार झाल्‍याचे सांगून औषधे देणे 

आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे माझ्‍या चाचणीचे अहवाल ७ दिवसांऐवजी २ दिवसांतच आले. माझ्‍या आजाराचे निदान ‘पॉझिटिव्‍ह’ आले. त्‍या वेळी आधुनिक वैद्य मला म्‍हणाले, ‘‘हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार असून फार क्‍वचित काही लोकांना होतो. तो तुम्‍हाला झाला आहे आणि तुम्‍हाला कधीही रुग्‍णालयात भरती करावे लागेल. मी औषधे देतो; पण ‘त्‍याने बरे वाटेलच’, असे नाही. तुम्‍हाला बरे होण्‍यास किती दिवस लागतील, हेही मी सांगू शकत नाही.’’ त्‍यानंतर आधुनिक वैद्यांनी मला औषधे दिली. त्‍या गोळ्‍या दिवसांतून ३ वेळा घ्‍यायच्‍या होत्‍या.

५. गुरुकृपेने गंभीर आजार बरा होणे

मी देवाला प्रार्थना करून रात्रीच्‍या गोळ्‍या घेतल्‍या आणि झोपले. आश्‍चर्य म्‍हणजे सकाळी उठल्‍यावर मी नेहमीप्रमाणे बोलू लागले. मी विशेष काही प्रयत्न न करता केवळ गुरुकृपेने माझा गंभीर आजार त्‍वरित बरा झाला. त्‍या वेळी माझ्‍याकडून श्री गुरुचरणी पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– सौ. कपिला महेश घाणेकर (वय ३७ वर्षे), डोंबिवली, ठाणे. (१३.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक