विवाहपूर्वी नोकरी करणार्‍या महिलेने घटस्फोटानंतर पतीकडून पूर्ण पोषणाचा खर्च मागू नये ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू (कर्नाटक) – विवाहापूर्वी नोकरी करणारी महिला घटस्फोट घेतल्यानंतर काम न करता बेरोजगार म्हणून घरी बसू शकत नाही आणि पतीकडून पूर्ण पोटगीही मागू शकत नाही. तिने तिचा चरितार्थ चालवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्यक्त केले. घटस्फोटित महिलेने तिच्या पोटगीमध्ये कपात करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका उच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त करत फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने या महिलेला प्रतिमहा मिळणार्‍या १० सहस्र रुपयांत कपात करून ५ सहस्र, तर हानीभरपाई म्हणून मिळणारे ३ लाख रुपये अल्प करून २ लाख रुपये केले होते.

उच्च न्यायालयाने म्हटले की, महिला विवाहपूर्वी नोकरी करत होती; परंतु ती आता नोकरी का करत नाही ?, याचे स्पष्टीकरण तिने याचिकेत दिलेले नाही. अशा प्रकारे बेरोजगार राहून ती पतीकडे पूर्ण पोषणभत्ता मागू शकत नाही. ती तिच्या जीवनाचा निर्वाह करण्यासाठी नोकरी करण्यास कायदेशीरित्या बांधलेली आहे. ती तिच्या घटस्फोट घेतलेल्या पतीकडे केवळ साहाय्य म्हणून खर्च मागू शकते.