मुंबई – कोरोना केंद्रांसाठी घोटाळा प्रकरणी ‘ईडी‘ने ठिकठिकाणी धाडी घातल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुंबईत १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. नेमकी काय कारवाई चालू आहे, हे मला ठाऊक नाही; पण निश्चितपणे सांगतो की, ज्या वेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना केंद्र चालू करण्यात आले, त्यानंतर या केंद्रातील घोटाळा बाहेर आला. त्या वेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेले आस्थापन सिद्ध झाले होते. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आले. पुणे येथे तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. या संदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोचली ? या धाडीत काय मिळाले ? हे ईडी सांगू शकेल. मला ठाऊक नाही. ज्या लोकांचे संबंध असतील त्यांची चौकशी चालू असेल. या संदर्भातील अधिकृत माहिती ‘ईडी’चे अधिकारीच देऊ शकतील.