‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले. त्यांच्या युवावस्थेत त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे मोठे ध्येय घेतले आणि ते पूर्णही केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या बालपणीच एका जाहीर वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन ओजस्वी आणि वीरतापूर्ण भाषण करून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या बालपणीच त्यांच्यात निर्माण झालेल्या राष्ट्रकार्य करण्याच्या ओढीचा युवावस्थेत विकास झाला. युवावस्थेत इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची चळवळ उभारण्याचे ध्येय घेतले आणि ते पूर्ण केले. या राष्ट्रपुरुषांनी त्यांच्या बालपणी घडलेल्या संस्कारानुसार युवावस्थेत मोठे राष्ट्रीय ध्येय घेऊन त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या वाटचालीत त्यांना अनेक दु:खाचे, मानहानीचे, अवमानाचे प्रसंग आले, संकटे आली, मोठ्या समस्या आल्या, तरी ते डगमगले नाहीत. त्यांची अतुलनीय ध्येयनिष्ठा, ध्येयासाठी वाटेल तो त्याग करण्याची सिद्धता, प्रचंड मनोबल या बळावर ते कार्यरत राहिले आणि अचाट पराक्रमाने ध्येयपूर्ती केली.
स्वामी विवेकानंदही म्हणायचे, ‘मला ध्येयाने झपाटलेल्या १०० युवकांची आवश्यकता आहे. या युवकांद्वारे मी भारताचा कायापालट करीन !’ ज्या देशात अशा राष्ट्रीय चारित्र्याचे महापुरुष जन्मले आहेत, तेथे कसली उणीव भासावी ?
भारतासारख्या विविधांगाने नटलेल्या देशात उत्तुंग चारित्र्याच्या महापुरुषांचा जन्म झाला असला, तरी आजच्या भारतातील बहुसंख्य बालके आणि युवा यांची स्थिती मात्र वेगळी आहे. गलितगात्र, तेजोहीन, बलहीन, स्वार्थी, संकुचित अशी काहीशी झालेली दिसते. नैतिकता खालावून स्वत्वही गमावल्यामुळे छोट्या छोट्या समस्यांपुढे, अडचणींपुढे ते नांगी टाकत आहेत. हातात लहानपणीच भ्रमणभाष पडून आणि त्यावर अनावश्यक, निरर्थक व्हिडिओ पाहून ते भरकटत आहेत. अधिकाधिक संकुचित होत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पालकांकडे हट्ट करणे, त्यांचे न ऐकणे असे करतात; मात्र काही बालके स्वत:चे वेगळेपण जपत स्वत:तील संस्कार वृद्धींगत करत आहेत. लहानपणीच ध्येय ठेवून प्रयत्नशील होत आहेत. यासाठी पालकांचे संस्कार आणि पाल्यांवर सातत्याने लक्ष ठेवून त्यांना घडवत रहाणे, दिशा देत रहाणे आवश्यक आहे. असे झाल्यास निश्चितपणे आजची ही बालके छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद आदी राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन युवा जीवन चांगले व्यतित करून राष्ट्राचे सक्षम नागरिक होतील, यात शंकाच नाही.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल (८.४.२०२३)