(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

  • ‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांचा दावा !

  • ‘बाबां’ना लंगोट घेऊन पळावे लागल्याचेही केले विधान !

‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई

नवी देहली – देवा शपथ सांगतो की, अल्लाने कृपा करावी आणि तो दिवस यावा अन् ‘अखंड भारत’ अस्तित्वात यावा. पाकिस्तानमध्ये रहाणारे २५ कोटी मुसलमान, बांगलादेशातील २५ कोटी मुसलमान आणि भारतातील २५ कोटी हे सर्व मुसलमान एक झाले, तर ७५ कोटी होतील. त्या दिवशी या देशात आमचा मुसलमान पंतप्रधान असेल,  आणि संसदेत २५० खासदार असतील, असे विधान ‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेच्या वेळी केले. यात जमाई यांनी पुढे म्हटले की, वर्ष २०२४ मध्ये ‘बाबां’ना लंगोट घेऊन पळावे लागले नाही, तर मी माझे नाव पालटेन. हा तुमच्या बापाचा देश नाही.’

या विधानांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ नेमके कोणत्या वृत्तवाहिनीवरील आहे, हे स्पष्ट झालेले नाही आणि ‘ते कोणत्या बाबाला उद्देशून बोलले’, हेही स्पष्ट झालेले नाही. काही लोकांनी या विधानांवरून उत्तरप्रदेश आणि देहली पोलीस यांच्याकडे तक्रारही केली आहे. जमाई यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात आहे.

अखंड भारत भविष्यात होण्याचे चित्र नाही, ही वस्तूस्थिती ! – जमाई यांचे स्पष्टीकरण

शोएब जमाई हे जामिया मिल्लिया इस्लामिया विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांच्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाल्याने त्यांनी ट्वीट करून याविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.

जमाई यांनी म्हटले की, रा.स्व. संघाकडून अखंड भारताविषयी बोलले जात आहे. अशा स्थितीत ‘काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही’, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. लोकसंख्येत वाढ होईल. भू-राजकीय स्थितीमध्ये पालट होईल. सर्वांचे (मुसलमानांचे) धर्मांतर केले जाईल. कोण कशासाठी धर्मांतर करून घेईल ? भीती दाखवून कि बलपूर्वक धर्मांतर करणार ? तेव्हा मी सांगितले की, अशा स्थितीत देशात मुसलमान पंतप्रधान बनू शकतो. त्यावर मला शिवीगाळ करण्यात आली. धमकी देण्यात आली. म्हणून मी सांगतो की, असे स्वप्न पाहू नका. कधीपर्यंत भ्रमात रहाणार आहात ? वस्तूस्थिती हीच आहे की, अखंड भारत भविष्यात होण्याचे चित्र नाही. त्यामुळे आता ज्या देशात रहात अहोत, त्यालाच चांगले बनवा.

संपादकीय भूमिका

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !