दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनात स्थानिकांना प्राधान्य हवेच ! – माजी खासदार नीलेश राणे

रत्नागिरी –  दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनामध्ये स्थानिकांना प्राधान्य हवेच, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी भारती शिपयार्डच्या नवीन व्यवस्थापनाकडे केली. या वेळी त्यांनी कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासमवेत बैठकही घेतली. या वेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषणही राणे यांनी केली.

दाभोळ येथील भारती शिपयार्डकडून स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात  आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नीलेश राणे यांनी दाभोळ येथे भेट दिली. दाभोळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेच्या वेळी सरपंच श्रीमती दाभोळकर, उपसरपंच श्री. उदय जावकर यांच्यासह भाजपचे उत्तर रत्नागिरीचे कार्याध्यक्ष केदार साठे, अन्य पदाधिकारी आणि शेकडो कामगार उपस्थित होते.

भारती शिपयार्ड पुन्हा चालू झाली असली, तरीही या आस्थापनाने स्थानिक कामगारांना सामावून घेतेलेले नाही. या कामगारांसाठी ठेवलेल्या अटी जाचक आहेत. त्याच वेळी जुन्या व्यवस्थापनाकडचा थकीत वेतनाविषयीचाही प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही.

या सभेनंतर राणे यांनी कामगारांसह आस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. राणे म्हणाले, ‘‘उद्योग चालले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे; मात्र आस्थापनाकडून जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी रहाणार असतील, तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे रहाणार. स्थानिकांना सामावून घेण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्यात यावा !’