अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे यशस्वी संशोधन !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – अश्‍वगंधा औषधी वनस्पतीच्या रेणूंमुळे (मॉलिक्यूलमुळे) कोरोना विषाणू नष्ट होतात, असे बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे. जगात प्रथमच अश्‍वगंधाच्या रेणूचा कोरोना विषाणूंवर होणार्‍या परिणामांचा अशा प्रकारे यशस्वीपणे अभ्यास करण्यात आला आहे. त्याला ‘जर्मन पेटेंट’ही मिळाले आहे. ३ वर्षांच्या अभ्यासानंतर हे यश या शास्त्रज्ञांना मिळाले आहे.

अश्‍वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे. सरकारच्या साहाय्याने आता रुग्णांवर चाचणी केली जाईल.

अश्‍वगंधा

संशोधन सहयोगी प्रशांत रंजन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर आतापर्यंत अश्‍वगंधाला अनुसरून कोणतेही संशोधन झालेले नाही. मानवी शरीरातील कोरोना विषाणू  पूर्णपणे नष्ट करण्यात हा अश्‍वगंधाचा रेणू उपयुक्त ठरेल.